महायुतीत भाजप जोमात बाकी कोमात
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपने मुंबई अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची नियुक्ती केली, साटम यांच्या नियुक्तीनंतर भाजपने मुंबईतील सहा मतदार संघातील आढावानिहाय बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर भाजपकडून देवाभाऊ यांच्या नावाने करण्यात आलेल्या जाहिरातीने वर्तमान पत्र, इलेक्ट्रॉनिक चॅनेलसोबतच मुंबईतील महत्त्वाच्या दर्शनी भागावर, बस स्टॉप आदी ठिकाणी भाजपने जोरदार प्रचार केला. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील विधानसभानिहाय प्रभारी विभागप्रमुखांची नियुक्ती केली आहे. सध्या पितृपक्ष असल्याने वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत जरी काहीजण असले तरी पितृपक्ष संपताच मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक ही डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. महापालिकेवर स्वबळावर भगवा फडकवण्यासाठी भाजपने मिशन 150 प्लसची घोषणा केली आहे, मात्र दुसरीकडे भाजप नेते महायुतीत एकत्र निवडणूका लढणार असल्याचे सांगत आहेत. आता 150 प्लसचा नारा दिला तर मग महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा देणार हा पण मोठा प्रश्न आहे. भाजपने ज्या पध्दतीने महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्यासाठी तयारी सुरू केली आहे, ते बघता इतर पक्ष अजुनही मागेच आहेत. महायुतीतील पक्षांची गणितेच भाजपवर अवलंबून असल्याचे दिसत आहे.
भाजपने मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघातील सहा नूतन जिल्हाध्यक्षांची निवड केली. या जिल्हाध्यक्षांच्या निवडीनंतर मुंबई भाजपचा अध्यक्ष म्हणून आमदार अमित साटम यांची निवड केली. साटम यांनी नियुक्ती झाल्यानंतर लगेचच कामाला लागत गणेशोत्सव काळात मुंबईभर दौरे केले. इकडे भाजपने मुंबई अध्यक्ष तसेच सहा जिल्हाध्यक्षांची निवड केल्यानंतर कोणी नियुक्तीविरोधात एक चकार शब्द काढलेला नाही. साटम यांच्याबरोबरच माजी आमदार सुनिल राणे, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, संजय उपाध्याय यांची नावे देखील चर्चेत होती, मात्र सगळ्यांनी साटम यांचे जोरदार स्वागत केले. राज्य सरकारने गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव करण्याचा निर्णय घेतला, मात्र या उत्सवातील जाहिराती बघता हा उत्सव राज्य सरकारचा कमी आणि भाजपचाच जास्त वाटत होता. भाजप आपला स्वतंत्र दबदबा करण्याचा प्रयत्न करत आहे. ठाण्यात देखील शिंदेंच्या बालेकिल्ल्यात देवाभाऊचे जोरदार
बॅनर लागले आहेत, त्यामुळे आगामी काळात शिवसेना विऊध्द भाजप यांच्यात स्थानिक पातळीवर कटुता वाढण्याची शक्यता आहे. भाजपच्या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच ब्रॅन्डींग होत आहे, त्यातच एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या वाटाघाटीपासून लांब ठेवल्याने भाजपने जो काय संदेश द्यायचा तो दिलेला आहे. तर ओबीसी उपसमिती बनवताना अध्यक्षपद महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिले आहे. छगन भुजबळ सारख्या मोठ्या नेत्याला या समितीत थोडे डावलले गेल्याची भावना आहे. मराठा आरक्षणाचा सरकारने काढलेल्या जीआरवर आक्षेप घेत भुजबळ कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता मराठा आरक्षणाचा राजकीय फायदा भाजपने घेतल्यानंतर ओबीसींच्या मनात भाजपविरोधी प्रतिमा निर्माण झाल्यास छगन भुजबळ हे ओबीसींना न्याय देण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात मुंबई आणि ठाण्यात आपले अस्तित्व ठेवण्यासाठी जोरदार संघर्ष सुरू आहे. त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात भाजपला होऊ शकतो, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात या महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर टांगती तलवार कायम आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरचा फायदा भाजपने घेतला असून याचा फायदा भाजपकडे होत असलेल्या पक्षांतरावऊन कळत आहे. गेल्या काही दिवसात शिवसेना शिंदे गटात आणि राष्ट्रवादीत होणारे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम देखील थांबले आहेत, मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पुढील राजकीय नियोजन करत भाजपात भविष्यात पक्षांतर वाढण्याची शक्यता आहे. भाजपचे नेहमीच मायक्रोप्लॅनिंग हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि निकालानंतर कळते.
भाजपने कोकणात चिपळूण येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांना गळाला लावले, तर आता दापोली विधानसभा मतदार संघातील मनसेचे नेते वैभव खेडेकर यांचा लवकरच भाजप प्रवेश होणार आहे. 2029 च्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवताना मिनी विधानसभा असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच भाजपकडून चाचपणी केली जाणार आहे. त्यासाठी आगामी काळात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई तसेच आजुबाजुच्या महापालिका निवडणूका बघता, मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते. भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत महायुतीत एकत्र लढणार असल्याचे बोलले जात असले तरी, भाजपने स्वबळाची तयारी केली आहे. मराठा आणि ओबीसी आंदोलनामुळेच जर भाजपची प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करता आली असती, मात्र फडणवीसांनी आपल्या चाणक्यनितीने हे चक्रव्युह देखील भेदले. ज्या फडणवीसांची प्रतिमा मराठा आरक्षण विरोधी होती, त्यांची आझाद मैदानावरील आंदोलनानंतर मराठा आरक्षणाचे जनक अशी प्रतिमा तयार करण्यात भाजप यशस्वी झाली आहे. ज्या एका मुद्यावर शिंदे आणि पवार यांना भाजपमध्ये महत्त्व होते, तोच मराठा आरक्षणाच्या मुद्दा आता भाजपने बुमरँग केल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.
प्रवीण काळे