For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हादईबाबत भाजप सरकार बनले बहिरे अन् आंधळेही!

11:49 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
म्हादईबाबत भाजप सरकार बनले बहिरे अन् आंधळेही
Advertisement

पणजी : कळसा-भांडुरा धरण प्रकल्पातील म्हादई नदीचे पाणी कर्नाटक सरकार मलप्रभा नदीत वळवत आहे. याला गोवा राज्यातील तमाम जनतेचा विरोध असतानाही हे काम जलद गतीने सुरू आहे. येत्या जून महिन्यापूर्वी म्हादई नदी कर्नाटकच्या घशात पूर्णपणे जाण्याची शक्यता असतानाही गोव्यातील विद्यमान भाजप सरकार कानावर हात ठेवून तसेच मूग गिळून गप्प आहे. याचाच अर्थ म्हादईबाबत सरकार गंभीर नसून, ते बहिरे व आंधळे बनले आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई म्हणाले, आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे, याचाच फायदा उठवत कर्नाटकने म्हादई नदीपात्रातील पाणी पूर्णपणे वळविण्याचा घाट घातला आहे. मलप्रभा नदीत हे पाणी वळवले जात असून, याबाबत सरकारकडे विचारणा करूनही ते दुर्लक्ष करीत आहे. याचाच अर्थ की, कर्नाटकातील 28 खासदार आहेत आणि म्हादई नदीला वाचविण्याच्या मुलभूत प्रश्नापेक्षा ह्या खासदारांची संख्या भाजप सरकारला मोठी वाटत आहे आणि त्यामुळे केंद्रातील भाजप नेतृत्वाने राज्यातील भाजप सरकारला म्हादईनदीबाबत थंड केले आहे, असा आरोपही सरदेसाई यांनी केला. म्हादई नदीला वाचविण्यासाठी आणि तिचे संरक्षण करण्यासाठी विरोधी तसेच सर्वपक्षीय विधानसभा सभागृह समिती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती. या समितीमार्फत म्हादईच्या प्रशानावर तोडगा काढण्यात येणार होता. तरीही मुख्यमंत्री सावंत यांनी या समितीची बैठक घेण्यास कोणाताच पुढाकार न घेता टाळाटाळ चालवलेली आहे. त्यामुळेच भाजपचे म्हादईबाबत खरे रूप समोर येते. म्हादईला वाचविण्यासाठी विधानसभा सभागृह समितीची बैठक घ्यावी, अशी मागणीही विजय सरदेसाई यांनी केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.