For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निपाणी पालिकेवर भाजपाचा झेंडा

10:21 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
निपाणी पालिकेवर भाजपाचा झेंडा
Advertisement

नगराध्यक्षपदी सोनल कोठडीया, उपनगराध्यक्षपदी संतोष सांगावकर : काँग्रेस पुरस्कृत नगरसेवक ठरले किंगमेकर, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Advertisement

वार्ताहर/निपाणी

बेळगाव जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी पालिकेच्या सभागृहात गुरुवारी प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपाने काँग्रेस पुरस्कृत नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी यश प्राप्त केले यातून नगराध्यक्षपदी सोनल राजेश कोठडीया तर उपनगराध्यक्षपदी संतोष हिंदुराव सांगावकर यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे भाजपने पालिकेवरील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले. दोन्ही निवडी होताच पालिका कार्यालयासमोर भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करताना गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी  केली.

Advertisement

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात मरगळ आली होती. अशा या परिस्थितीत लागलेल्या नगरपालिका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीमुळे भाजपा व राष्ट्रवादीमध्ये चुरस लागली होती. भाजपाकडे आमदारांचे मत धरून 14 मते तर राष्ट्रवादीकडे 13 मतांचे बलाबल होते. काँग्रेसकडे खासदारांचे मत धरून 5 मते होती. यामुळे काँग्रेसकडेच सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. अशा या परिस्थितीत झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत असणाऱ्या तीन नगरसेवकांनी भाजपाला पाठबळ दिले. यामुळे भाजपाने पालिकेवरील आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी आपल्या मताचा अधिकार नोंदवताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले.

नगरपालिका कार्यालयात प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांच्या अधिपत्याखाली सकाळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी सोनल कोठडीया तर राष्ट्रवादीकडून अनिता पठाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून संतोष सांगावकर तर राष्ट्रवादीकडून शेरू बडेघर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक अर्जांची छाननी झाल्यानंतर अर्ज माघार घेण्याच्या मुदतीपर्यंत कोणीच अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक जाहीर झाली. नगरपालिकेतील 30 नगरसेवक व आमदार आणि खासदार अशी 32 मते पात्र होती. नगरपालिका सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडताना भाजपा उमेदवारांना आमदार शशिकला जोल्ले यांच्या मतासह 17 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या मतासह 14 मते मिळाली. यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांसाठी भाजपा उमेदवारांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. सुनीता गाडीवड्डर या एकमेव नगरसेविका गैरहजर राहिल्या.

काँग्रेस पुरस्कृत नगरसेवक असणारे विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार आणि जसराज गिरे या तीनही नगरसेवकांनी भाजपा उमेदवारांना पाठिंबा दिल्याने विजयातून ते किंगमेकर ठरले. निवडीनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी नगरपालिका कार्यालयासमोर डीजेच्या दणदणाटात गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यकर्त्यांनी भाजपासह जोल्ले दांपत्याच्या नावे विजयाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. निपाणी शहर व उपनगरांच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक कार्य करण्याची ग्वाही यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, भाजपा नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

नूतन पदाधिकारी आज स्वीकारणार पदभार 

नूतन नगराध्यक्ष सोनल कोठडीया व उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर हे शुक्रवारी नगरपालिका कार्यालयात सकाळी 11 वाजता पदभार स्वीकारणार आहेत. याप्रसंगी आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह नगरसेवक, भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Tags :

.