वयोमर्यादेचे अटीने भाजपसमोर पेच
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत चर्चा : विनय तेंडुलकर, नरेंद्र सावईकर, दामू नाईक यांची उपस्थिती,दक्षिण, उत्तरेत आज बैठका; आमदारांना येण्याचे निर्देश
पणजी : भारतीय जनता पक्षामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय गोवा नेतृत्वाने घेऊन भाजप मंडळ आणि जिल्हा अध्यक्षांसाठी वयाची अट लावली होती. परंतु या अटीनुसार पूर्वीपासूनच मंडळ व जिल्हा अध्यक्षासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा प्रश्न कसा सोडवावा, याविषयी काल बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या महालक्ष्मी या निवासस्थानी झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्यासमवेत भाजपचे माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, संजीव देसाई आदी उपस्थित होते.
वयाच्या अटीवर काढणार तोडगा
भाजपच्या मंडळ आणि जिल्हा अध्यक्षांसाठी वयाची अट घालण्यात आली आहे. भाजप मंडळ अध्यक्षपदासाठी 45 वर्षे कमाल वयोमर्यादा गरजेची असून, जिल्हा अध्यक्षांसाठी 60 वर्षे कमाल वयोमर्यादा लागू केली आहे. परंतु पक्षाच्या या निर्णयामळे गोवा भाजपातील नेत्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात आल्यानेच आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हा आणि मंडळ अध्यक्षांबाबत प्रमुख जबाबदारी असलेले सावईकर, तेंडुलकर, दामू नाईक, संजीव देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर वयाच्या या अटीवर तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. भाजप पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांविषयी दिल्लीत निर्णय होणार आहे. त्यानंतर केंद्रीय निरीक्षक गोव्यात आल्यानंतर वयोमर्यादेबाबची प्रक्रिया पार पाडली जाण्याची शक्यता आहे. गोवा भाजपच्या संघटनात्मक निवडणुका जानेवारी 2025 अखेरपर्यंत होणार असल्याने त्यापूर्वीच वयोमर्यादेबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
उत्तर, दक्षिणेत आज बैठका
राज्य कार्यकारिणी निवडण्यासाठी भाजपची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे भाजपच्या मंडळ आणि जिल्हा अध्यक्षांची समिती तसेच या समितीवर अध्यक्ष निवडण्यासाठी उत्तर गोव्यातील म्हापसा तर दक्षिण गोव्यातील मडगाव या ठिकाणी आज गुऊवारी 2 जानेवारीला बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत उत्तर आणि दक्षिण जिह्यातील भाजपचे आमदार तसेच मंडळ व जिल्हा अध्यक्षांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या संघटन प्रमुखांना उपस्थित राहण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष तानावडे व मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेले आहेत.
वीजमंत्री ढवळीकर यांची मुख्यमंत्र्यांशी भेट
मगो पक्षाचे नेते आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील बंगल्यावर झालेल्या बैठकीवेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानवडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मात्र तानावडे यांनी मंत्री ढवळीकर हे मुख्यमंत्र्यांची अगोदर अपॉइंटमेंट घेऊन आले होते, त्यांची पूर्वनियोजित भेट होती. आमच्या बैठकीचा त्यांच्याशी काही संबंध नाही असे सांगितले. तथापि राजकीय वर्तुळात मात्र याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
प्रत्येक कार्यकर्त्याकडून पक्षासाठी योगदान
भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्ष हितासाठी आणि पक्ष वाढीसाठी योगदान देत आलेला आहे. सर्वच मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ही भाजपची ताकद आहे. 10 जानेवारीपूर्वी मंडळ अध्यक्षांची निवडणूक होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संघटनांतर्गत निवडणुकीविषयी चर्चा झाली आहे. वयोमर्यादेत बदल करणे महत्त्वाचे ठरल्याने 45 वर्षांहून कमी वयोगटातील मंडळ अध्यक्ष ठेवण्याचा विचार पुढे आला. जिल्हा अध्यक्ष हा 60 वर्षांहून अधिक वयोगटाचा नसावा, याबाबतही विचारमंथन करण्यात आले. यामध्ये कुणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही.
- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष