भाजपकडून मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
बेंगळूर : परप्पन अग्रहार कारागृहात कैद्यांची शाही बडदास्त ठेवण्यात येत असल्याचे उघडकीस आल्याने भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधानपरिषद विरोधी नेते चलवादी नारायणस्वामी यांच्यासह भाजप आमदार व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बेंगळुरातील निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनप्रसंगी बोलताना विजयेंद्र म्हणाले, राज्य सरकारच्या कुमकशिवाय कारागृहात कैद्यांना सोयी-सुविधा पुरविणे शक्य नाही. दहशतवाद्यांना अशा सुविध पुरविणे हा देशद्रोह आहे. याला मुख्यमंत्री सिद्धरामय्या व गृहमंत्री डॉ. परमेश्वर कारणीभूत आहेत. त्यांनी पदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली.