मंत्री विखे-पाटील यांना निवेदन देणाऱ्या भाजपच्या शिष्टमंडळाला रोखले!
स्थानिक कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी : प्रदेशाध्यक्षांना थेट केला फोन
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्याचे महसूल तथा दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला रोखण्यात आल्याचा प्रकार बुधवारी घडला. या प्रकारानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांतून तीव्र नाराजी व्यक्त झाली. दरम्यान, नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली.
मंत्री विखे-पाटील बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते शहरातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेले. शासकीय दौरा कार्यक्रमानुसार त्यांचा येथील शासकीय विश्रामगृहावर सकाळी 11 : 20 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राखीव वेळ होता. पण ते पंचतारांकीत हॉटेलवर असल्याचे समजल्याने स्थानिक भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मंत्री विखे-पाटील यांना निवेदन देण्यासाठी पंचतारांकीत हॉटेलवर गेले. त्या ठिकाणी मंत्री महोदयांच्या ओएसडींना भाजपचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी आले असल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी शिष्टमंडलाला हॉटेलच्या खाली असलेल्या लॉबीतच थांबण्यास सांगण्यात आले. त्यानुसार कार्यकर्ते प्रतिक्षा करत थांबले. पण मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांकडून भेटू देण्यासंदर्भात बोलवणे न आल्याने पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, तुम्ही लॉबीतच थांबा मंत्री महोदय तेथेच तुमचे निवेदन स्वीकारतील, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेले शिष्टमंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते लिफ्टमधून मंत्री विखे-पाटील असलेल्या मजल्यावर गेले. तेथे अधिकारी आणि सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांचा रोखणाऱ्यांबरोबर वाद झाला. भेट नाकारल्याने नाराज झालेले कार्यकर्ते हॉटेलच्या बाहेर आले. तेथून त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. बावनकुळे यांनी नाराज झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर इतर नेते भेटत होते
भाजपच्या शिष्टमंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते लॉबीत प्रतिक्षा करत असताना मंत्री विखे-पाटील यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील आमदार, साखर कारखान्यांचे संचालक, विविध दूध संघांशी संबंधित पदाधिकारी जात होते. भाजपचे मंत्री असणारे विखे-पाटील बड्या लोकांना भेटतात. मात्र आपल्याच पक्षांचे कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आले असताना त्यांना रोखले जाते. हा पक्ष वाढविण्यासाठी जीवाचे रान केलेल्या, राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा अवमान आहे, अशा शब्दात स्थानिक भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांने आपली भावना व्यक्त केली.
फडणवीस, चंद्रकांतदादांनाही माहिती देणार
दरम्यान, मंत्री विखे-पाटील यांच्या भेटीसंदर्भात घडलेल्या प्रकाराची माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही याबाबत माहिती देणार असल्याचे स्थानिक भाजपच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले.