भाजपतर्फे राज्यात गुप्तपद्धतीने सर्वेक्षण
प्रत्येक आमदारांची, मतदारसंघाची होणार पोलखोल : अनेक नेत्यांचे धाबे दणाणले
पणजी /विशेष प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीतर्फे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून गोव्यात गुप्तपद्धतीने सध्या सर्वेक्षण सुरू झाल्याचे वृत्त असून त्यामुळे अनेक नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते अरुण सिंग हे उद्या गोव्यात येत असून ते महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत.
पक्ष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय पातळीवरून गोव्यात आपले सर्वेक्षण सुरू केले आहे. पक्षाची सध्याची गोव्यातील परिस्थिती काय, तसेच प्रत्येक आमदारांची त्यांच्या मतदारसंघात असलेली अवस्था शिवाय जनतेच्या मनात नेमके काय आहे याची चाचपणी पक्षीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे, मात्र याची कोणतीही माहिती स्थानिक नेतृत्वाला दिलेली नाही. मात्र पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना या गोष्टीचा सुगावा लागला असून त्यामुळे अनेकांची धावपळ सुरू झाली आहे.
सर्वेक्षणाबाबत आम्हाला कल्पना नाही : सदानंद तानावडे
यासंदर्भात प्रदेश भाजप अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद तानवडे यांच्याशी संपर्क साधला असता आमच्यापर्यंत काहीही कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वेक्षणाबाबत आम्हाला अधिकृत कोणतीही माहिती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पक्षाचे नेते अऊण सिंग हे उद्या गोव्यात येत आहेत ते पुढील दोन दिवस गोव्यात राहतील आणि आपल्या गोवा भेटीत हे अनेकांबरोबर स्वतंत्रपणे चर्चा करतील. तसेच विविध पक्षीय पातळीवर समित्या, त्यांचे गठन, तसेच प्रदेश राज्य कार्यकारिणी यासंदर्भातही सर्व घटकांशी चर्चा करतील.
महिलांनाही आता स्थान
भाजपने प्रथमच गटसमित्यांच्या अध्यक्षपदी महिला नेत्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी तीन अध्यक्षांची निवडीची घोषणा सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आली. त्यामध्ये दाबोळी, फातोर्डा आणि मुरगाव मतदारसंघांचा समावेश आहे. भाजप आज तीस गट अध्यक्षांची घोषणा करणार आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, सर्व गट अध्यक्षांची निवड सर्वानुमते करण्यात आलेली आहे आणि कोणतीही कटूता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही. सर्वकाही सुरळीत असल्याचे ते म्हणाले.
ढवळीकरांचा मुंबई दौरा
आणखी एका घडामोडीत राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. शनिवारी सायंकाळी ते गोव्यात पोहोचले. दोन्ही नेत्यांदरम्यान नक्की कोणती चर्चा झाली हे समजू शकले नाही.