सावंतवाडी मतदारसंघावर भाजपचा दावा; पक्षश्रेष्ठींकडे करणार मागणी - प्रभाकर सावंत
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपची संघटना मजबूत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आम्ही आमचा दावा करणार आहोत. आणि तसे आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मागणीही करणार आहोत . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागांवर भाजपच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने प्रदेश कडून आम्हाला सुचित करण्यात आले आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जे काही सांगतील त्यानुसार आम्ही सर्वजण काम करू असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन जे वक्तव्य केले आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. त्यांनी देशद्रोही वक्तव्य केले आहे . त्यामुळे त्यांच्या पक्षाची व त्यांच्या घटक पक्षाची भूमिका आता स्पष्ट झाली आहे. दुटप्पी भूमिका घेऊन वागणाऱ्या या व्यक्तींचा आम्ही निषेध करत आहोत असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी भूमिका घेतली आहे त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळेल अशी आमची धारणा आहे असेही ते म्हणाले. प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने काम करावे लागते त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप संघटना मजबूत असल्याने तेथे इच्छुकांची संख्याही अधिक आहे. तिन्ही जागांवर आम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहोत. निश्चितपणे आम्हाला अपेक्षित जागा मिळतील याची आम्हाला खात्री आहे. आणि वरिष्ठांवर आमचा विश्वास आहे असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजू परब ,सरचिटणीस महेश सारंग ,रवींद्र मडगावकर, महेश धुरी ,सुधीर दळवी ,सुहास गवंडळकर.,प्रमोद गावडे ,बाळू शिरसाट,संजय विर्नोडकर , मधुकर देसाई आदी उपस्थित होते.