उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
वृत्तसंस्था/लखनौ
भाजपने उत्तरप्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत 7 उमेदवारांची नावे आहेत. भाजपने करहल मतदारसंघात लालूप्रसाद यादव यांचे जावई आणि अखिलेश यादव यांचे पुतणे तेजप्रताप यादव यांच्या विरोधात अनुजेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने कानपूरच्या सीसमऊ आणि मीरापूर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
उत्तरप्रदेशच्या 9 विधानसभा मतदारसंघांमध्ये 13 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सीसामऊ मतदारसंघात सप आमदार इरफान सोलंकी यांना शिक्षा झाल्याने तेथे पोटनिवडणूक घ्यावी लागली आहे. तर 9 आमदार हे लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांचे मतदारसंघ रिक्त झाले आहेत.
करहल मतदारसंघाचे आमदार सप अध्यक्ष अखिलेश यादव हे आता कनौजचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. करहल मतदारसंघात भाजपने सपचे खासदार धर्मेंद्र यादव यांचे नातेवाईक असलेल्या अनुजेश यांनाच उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपची लढत थेट यादव परिवारासोबत आहे. अशा स्थितीत यादव परिवाराच्या सदस्यालाच भाजपने मैदानात उतरविले आहे.