कुडाळ येथे भाजपने जाळला काँग्रेस खासदारांचा पुतळा
वार्ताहर/कुडाळ
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार धीरज साहू यांच्याकडे 300 करोडची बदनामी संपत्ती आढळून आली. त्यांच्या या भ्रष्टाचारा विरोधात सोमवारी कुडाळ भाजप महिला मोर्चाच्या वतीने व भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी साहू यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या पुतळ्यावर शाही ओतून जोडे मारीत पुतळ्याचे दहन करीत आंदोलन छेडले. यावेळी साहू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत निषेध करण्यात आला.
कुडाळ पोस्ट ऑफिस येथील भाजप कार्यालयासमोर भाजप महिला मोर्चाच्या महिलांनी व पदाधिकारी-कार्यकर्ते शाहू यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत रस्त्यावर उतरले.
ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष रणजित देसाई व ओबीसी जिल्हा अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी भाजप महिलांनी व कार्यकर्त्यांनी 'काँग्रेसचा हात पोटावर लाथ', '70 वर्ष देश लुटला काँग्रेसने फक्त पैसा खाल्ला', 'देशाचा एक एक रुपया परत द्यावाच लागेल धीरज साहुला जेलची हवा खावीच लागेल', 'भ्रष्टाचारी काँग्रेसचा निषेध असो', 'काँग्रेस हटाव गरीब बचाव' 'ना नीती विकासाची ना भीती कायद्याची काँग्रेसला आहे फक्त हाव नोटांची' आदी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, ओबीसी जिल्हा अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते,महिला सरचिटणीस रेखा कानेकर,माजी सभापती नूतन आईर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे, नागेश आईर, युवा मोर्चा ओरोस मंडळ अध्यक्ष पप्या तेवटे, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, तन्मय वालावलकर, सुप्रिया वालावलकर, राजश्री नाईक, मुक्ती परब, साधणा माडये, रेवती राणे, प्रज्ञा राणे आदी भाजप महिला व पदाधिकारी उपस्थित होत्या.
दीपलक्ष्मी पडते म्हणाल्या, राज्यसभेचे खासदार धीरज साहू यांनी चुकीच्या पद्धतीने पैसा कमविला आहे. कोट्यवधी रुपये त्यांनी गोळा केले आहेत. 300 कोटी एवढी मोठी रक्कम गोळा करणाऱ्या अशा भ्रष्टाचारी काँग्रेस खासदाराला काँग्रेस पक्षाने प्रत्येक वेळी पाठीशी घातले. त्यांचा आतापर्यंतचा इतिहास काढला तर 70 वर्षे सत्ता करून त्यांनी अशा प्रकारचे भ्रष्टाचार केले आहेत. अशा भ्रष्टाचारी माणसाला आम्ही भाजप महिला मोर्चा पदाधिकारी विरोध करण्यासाठी त्यांचा निषेध करीत आहोत. आज भाजप सरकार उत्कृष्ट काम करीत आहे. प्रत्येकवेळी आम्ही एक पाऊल पुढे जात आहोत . असे असताना भ्रष्टाचारी घटना आपल्या समोर येत आहेत.300 कोटी रक्कम ही छोटी रक्कम नाही. काँग्रेस पक्षाने एवढी वर्षे सत्ता करून असे भ्रष्टाचारी पाळले आहेत. त्याला आमचा विरोध आहे. असे त्यांनी सांगितले. आंदोलनस्थळी पोलीस प्रशासन मात्र उशीरा दाखल झाले.