केरळमध्ये भाजपचे आंदोलन
वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम
केरळमध्ये एका वरीष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणासंदर्भात भारतीय जनता पक्षाने तेथील राज्य सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे. राज्यातील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नवीन बाबू के. यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत त्यांच्या सरकारी निवासस्थानी आढळून आला होता. त्यांची कानूर जिल्ह्याच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. ते पदभार हाती घेण्यासाठी कानूर येथे जाण्यापूर्वीच त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांचा मृत्यू ही हत्या आहे असा त्यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे.
भारतीय जनता पक्षाने बुधवारी या प्रकरणी आवाज उठविण्यासाठी कानूर जिल्हा प्रशासकीय कार्यालयाबाहेर धरणे धरले होते. जिल्हा पंचायत अध्यक्षा पी. पी. दिव्या यांचा या दंडाधिकाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. राज्यातील महसूल अधिकाऱ्यांनीही नवीन बाबू यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी राज्य सरकारविरोधात आंदोलन चालविले आहे. बाबू हे अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांपैकी अनेकांना ते नको होते. दिव्या यांनी बाबू यांच्या विरोधात अनेक बनावट आरोप केले आहेत. दिव्या यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही आंदोलनकर्त्या महसूल अधिकाऱ्यांनी बुधवारी केली आहे.
आत्महत्या की हत्या
बाबू यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. दिव्या यांनी त्यांच्याविरोधात खोटे आरोप केल्याने अपमान असह्या होऊन त्यांनी आत्महत्या केली, असेही काही जणांचे मत आहे. मात्र, त्यांचा मृत्यू संशयास्पद असून हत्येची शक्यता गृहित धरुन तपास केला जावा, अशी त्यांच्या कुटुंबियांची आणि सहकाऱ्यांची मागणी आहे. या प्रकरणामुळे केरळच्या राज्यसरकारची मोठी अडचण झाली असून प्रकरण दडपण्याचा आरोप सरकारवर केला जात आहे. राज्य सरकारने अद्याप या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.