For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिहारमध्ये भाजप 17, जेडीयूला 16 जागा

06:13 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिहारमध्ये भाजप 17  जेडीयूला 16 जागा
Advertisement

एनडीए’चे जागावाटप निश्चित : चिराग पासवान यांच्या ‘एलजेपी-रामविलास’ला 5 जागांची ‘लॉटरी’

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बिहारमधील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जागावाटप चर्चेअंती पक्षनिहाय जागा ठरल्या आहेत. त्यानुसार भाजप 17 जागा, जेडीयू 16, एलजेपी रामविलास 5, उपेंद्र कुशवाह 1 आणि जीतनराम मांझी 1 जागा लढवणार आहे.

Advertisement

नवी दिल्लीत भाजप नेते विनोद तावडे, सम्राट चौधरी, मंगल पांडे, जेडीयू नेते संजय झा, जीतन राम मांझी, एचएएमचे दिल्ली अध्यक्ष रजनीश कुमार, आरएलएम अध्यक्ष उपेंद्र कुशवाह, चिराग पासवान यांच्या उपस्थितीत सोमवारी पत्रकार परिषदेत जागावाटपाबाबत मोठी घोषणा करण्यात आली. जागावाटप चर्चेसाठी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार दिल्लीत पोहोचले होते. सध्याच्या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 17 जागा आल्या आहेत. त्याखालोखाल जेडीयू 16 जागा लढवणार आहे. तर चिराग पासवान यांचा पक्ष ‘एलजेपी रामविलास’ला 5 जागा, जीतन राम मांझी यांच्या पक्षाला (एचएएम) 1 जागा, उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला (आरएलएम) 1 जागा मिळणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच उपेंद्र कुशवाह यांना बिहारमध्ये त्यांच्या पक्षाला एक-दोन जागा हव्या आहेत. तसेच मुकेश साहनी यांच्याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जागांची अदलाबदल शक्य

राजकीय पक्षांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील एनडीएच्या दोन प्रमुख घटक भाजप आणि जेडीयूमध्ये 1-2 जागांची जुळवा-जुळव होऊ शकते. राज्यातील उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अजूनही पूर्ण व्हायची असल्यामुळे काही चेहऱ्यांचे म्हणजेच विद्यमान खासदारांचे तिकीटही कापले जाऊ शकते. बिहारमध्ये सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याने तिकीट वाटप अद्याप रेंगाळलेले आहे. या दिरंगाईमुळे संभाव्य उमेदवारांच्या हृदयाचे ठोकेही वाढले आहेत.

पशुपती पारस यांचा पत्ता कट! आता मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता

सध्या मोदी सरकारमध्ये अन्न आणि प्रक्रिया मंत्री असलेले आणि एनडीएचा मित्रपक्ष एलजेपी प्रमुख पशुपती पारस यांना बिहारमध्ये एकही जागा मिळालेली नाही. आता एनडीएमध्ये आघाडीत जागा न मिळाल्याने पशुपती पारस लवकरच मोदी मंत्रिमंडळाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चिराग पासवान यांच्या ‘एलजेपी-रामविलास’ला जागावाटपात लोकसभेच्या 5 जागा मिळाल्याने पशुपती नाराज असल्याचे बोलले जात आहे. जागावाटपाच्या घोषणेपूर्वी आपल्याशी चर्चा न केल्याचा रागही पशुपती पारस यांना आहे.

पशुपती पारस यांना यापूर्वीच सुगावा

पशुपती पारस यांना आपल्या पक्षाला एनडीएमध्ये एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज यापूर्वीच आला होता. यानंतर त्यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक बोलावत दबावतंत्र बनवले होते. खासदारांसोबतच्या बैठकीनंतर पारस यांनी ‘आम्हाला योग्य सन्मान दिला नाही, तर आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमचे दरवाजे उघडे आहेत,’ अशी धमकीही त्यांनी दिली होती. आता जागावाटप जाहीर झाल्याने त्यांची नाराजीही उघडपणे समोर येत आहे. या निर्णयानंतर पशुपती पारस नाराज असून महाआघाडीसोबत जाण्याच्या शक्मयतेचाही विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.