वाढदिवस आणि राजकारण
महाराष्ट्रात काहीही झालं तरी त्यांचा संबंध शरद पवारांशी जोडला जातो. काही वेळा तो असतोही पण अनेकवेळा हा ‘साहेबांचा’ डाव म्हणत पारापारावर चर्चा होते. ते गप्प बसले तरी अनेकांना भीती वाटते आणि त्यांनी पाठ थोपटली, कौतुक केले तरी अनेकांना घाम फुटतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी केलेले कौतुक आणि सेम डे अजितदादा पवार यांचा वाढदिवस असून केलेला कानाडोळा हा पारावर चर्चेचा बनला आहे. गेल्या चार दशकात शरद पवार यांची राष्ट्रीय व महाराष्ट्रीय राजकारणावरील पकड, सावध भूमिका, बंडखोर वृत्ती जोडीला सत्तेसाठी सोईचे तत्वज्ञान आणि अनेकवेळा पाळलेले मौन अशी अनेक कारणे त्याला आहेत. मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस होता. राज्यभर दोघांचे. पक्ष आणि समर्थक विविध उपक्रम राबवत होते. दिल्लीत उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी अचानक राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव तो दिला असे सांगितले गेले तरी तो घेतला की दिला यावरुन गदारोळ सुरुच होता. संसदेत हंगामा हे नित्याचे आहे. जिथे बोलायचे, विचार मंथन करायचे तेथे दंगा, बहिष्कार, आरडा आणि बाहेर येऊन बोलू देत नाहीत म्हणून ओरड, त्यातच आता हरीभाऊ बागडे उपराष्ट्रपती होतात का, बिहारचे नितीशकुमार यांना संधी दिली जाते यावरुन खलबतं व घालमेल सुरू आहे. देवाभाऊ गडचिरोलीत वाढदिवस साजरा करत होते तर अजितदादा होमपिचवर केक कापत होते पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे कान मुंबईकडे लागले होते. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पत्रकार परिषदेत काय बोलतात, विरोधी नेत्यांनी यापूर्वीच धनंजय मुंडे यांची विकेट घेतली आणि त्या कृषीमंत्रीपदावर आलेल्या माणिकराव कोकाटेंना विरोधकांनी घाईला आणलं आहे. खरं तर सरकारला चार संजय नावाचा नेत्यांमुळे अडचणीचे पहाड निर्माण झाले आहेत, संजय राऊत, संजय शिरसाट, संजय केळकर, संजय गायकवाड. प्रत्येकांची तऱ्हा वेगळी पण त्यांचा ताण फडणवीस सरकारचा पडतो आहे. गळा आवळण्याचे काम ही मंडळी करत आहेत. कोण बनियन टॉवेलवर, आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्यांस बदडतो आहे, कोण बेडरुममध्ये तशाच अवतारात पैसे भरलेल्या नोटांच्या बॅगेजवळ मांडी ठोकून बसला आहे तर कोण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यात आडवा पाय घालत आहे. सकाळचा दहाचा भोंगा विश्व प्रवत्ते रोज शेलके आरोप आणि निंदा नालस्ती करत लक्षावर अचूक संधान साधत आहेत. त्यामुळे वाढदिवसाचा आनंद ना देवाभाऊंना घेता येत होता, ना अजितदादांना त्यामुळे राज्यभर बॅनर, पोष्टर, उपक्रम आणि शुभेच्छा जाहिरात वर्षाव होत असतानाही कापलेला केक गोड लागत नव्हता. तोंडावर स्माईल आणि पोझ देत ‘गडचिरोली नक्षलीमुक्त करणार वगैरे घोषणा केल्या आणि शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी देवाभाऊवर
स्मृतिसुमने उधळली असली तरी मन निवांत, आनंदी आणि निश्चित दिसत नव्हते. माणिकराव कोकाटे यांनी शासनच भिकारी असे म्हणत घरचा आहेर दिला व आपल्या तोंडातूनच स्वत:वर संकट ओढवून घेतले. वर ते म्हणाले ‘मी एखाद्या महिलेचा विनयभंग केलाय की अन्य काही गंभीर गुन्हा केलाय?’ मी कशासाठी राजीनामा देऊ? इतकं म्हणून ते थांबले नाहीत. ‘हल्ली भिकारीही एक रुपया भीक घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयाचा पिकविमा दिला’ असे सांगत त्यांनी नवीन वाद ओढवून घेतला. विधीमंडळ सभागृहात कोकाट्यांच्या मोबाईलवर पत्त्याची पाने दिसत आहेत आणि कोकाटे डोके खाजवत मोबाईल बघत आहेत, असा व्हिडिओ विरोधी आमदार रोहीत पवार यांनी व्हायरल केला होता. कोकाटेंनी त्यावर खुलासा केला पण नामवंत, गुणवंत त्यांच्या पाठीमागे लागत राजीनामा मागणी करु लागले. विरोधकांना सरकारची दुसरी विकेट काढायची घाई आहे. एकूण सूर पाहता ती पडेल असे दिसते आहे पण मोबाइल त्यावरचा सोशल मीडिया, रिल आणि एकुणच मारामारीपासून बाहेर तुला बघतोच, पर्यंतचे सर्व पुराण महाराष्ट्राला शोभादायक नाही. शोभादायक पेक्षा आणखी कडवे, शेलके शब्द वापरता येतील पण ते संपादकीय परंपरेला शोभणार नाहीत. कोकाटे व्हिडिओमध्ये सापडले म्हणून पण अनेक नेते, पुढारी, पदाधिकारी काय करतात हे सर्वांना ज्ञात आहे तर अशा वातावरणात राजकारण गढूळ झाले असताना ना देवाभाऊला, ना अजितदादाला वाढदिवस आनंदाने साजरा करता आला असेल. दादांच्या कार्यकर्त्यांनी दादांच्या सासुरवाडीत ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर झळकवले तर भाजप मंडळींनी देवाभाऊसाठी ‘महाराष्ट्र नायक’ हा गौरव ग्रंथ प्रसिध्द करुन नव्या चर्चांना प्रारंभ करुन दिला. या गौरव ग्रंथात शरद पवार यांनी फडणवीस थकत कसे नाहीत? असा सवाल करत फडणवीस यांचा कामाचा झपाटा पाहिला की मला पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो काळ आठवतो असे म्हटले तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची प्रगती झाली असे कौतुक करत त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्ये महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक क्षेत्रात विकसित झाला, असे प्रमाणपत्र दिले व फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. कट्टर विरोधक आणि टोमणे बहाद्दर यांच्या लेखणीतून झालेला स्तुतिसुमनांचा वर्षाव राजकारणात चर्चेचा झाला आहे. शरद पवारांनी पुतण्यासाठी शुभेच्छा दिल्या असतीलच पण स्तृतीसुमने उधळली नाहीत, यांचीही चर्चा होत राहणार आहे. एकुण काय पवारांनी काही केले किंवा न केले तरी चर्चाही होणारच पण आता विधीमंडळ अधिवेशन संपले आहे, संसदेचे अधिवेशन सुरु आहे. रोज राजकारणाची राळ उठणारच. माणिकराव कोकाटे यांचे काय होते, ठाकरे बंधू राजकीय युती करणार का? आणि मुंबई महापालिकेत कुणाची सत्ता हे प्रश्न व त्यासाठीचे राजकारण तेवत राहणारच. तूर्त केक कापून खाऊन झालेत.