बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री फार्म व्यावसायिकांत भीती
बेळगाव : शेजारील महाराष्ट्र राज्यात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण होत असल्याने बेळगाव जिल्ह्यात खबरदारी घेण्यात आली असली तरी, यामुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यात बेळगाव जिल्हा पोल्ट्री व्यवसायात आघाडीवर आहे. जिल्ह्यात 85 अंडी देणाऱ्या केंबड्यांचे फार्म आहेत. तर 823 ब्रॉयलर कोंबड्यांचे फार्म आहेत. यामध्ये अंदाजे 50.40 लाख कोंबड्या आहेत. या पार्श्वभूमीवर पशुसंगोपन खात्याच्या वतीने विक्रीसाठी आलेल्या 330 हून अधिक कोंबड्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
त्याचबरोबर काही भागात मृत्यू झालेल्या कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने देखील घेतले जात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील 908 पोल्ट्री फार्ममधून महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध जिल्हे, कर्नाटकातील बागलकोट, विजापूर, धारवाड, हावेरी, गदग, दावणगेरी, चित्रदुर्ग, कोप्पळ जिल्ह्यांसह विविध शहरांमध्ये कोंबड्या आणि अंडी पुरविली जातात. त्याचबरोबर आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांना कोंबड्यांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पशुसंगोपन खात्याकडून बर्ड फ्लूसंदर्भात पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच पोल्ट्रीवर देखील बारीक नजर ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर सीमावर्ती भागात चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत.
दररोज 50 हजार कोंबड्यांची विक्री
जिल्ह्यात सध्या दररोज अंदाज 50 हजार कोंबड्या आणि लाखांहून अधिक अंड्यांची विक्री केली जाते. शहरासह ग्रामीण भागात चिकन खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महामार्गालगतचे धाबे, हॉटेल्स आदी ठिकाणी 25 हजार कोंबड्यांची दररोज मागणी असते. मात्र बर्ड फ्लूची लागण होत असल्याने चिकन आणि अंडी खाऊ नयेत अशा खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
चिकन किंवा अंडी खाल्याने बर्ड फ्लू होतो हा गैरसमज
चिकन किंवा अंडी खाल्याने बर्ड फ्लू होतो हा गैरसमज आहे. मांस खाताना ते चांगले शिजवून खाल्ले पाहिजे. नागरिकांनी विनाकारण भीती बाळगू नये, जिल्ह्यात असाधारण कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे तशा फार्मना भेट देऊन पाहणी केली जात आहे. 339 कोंबड्यांचे नमुने ताब्यात घेऊन ते प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत.
- डॉ. राजीव कुलेर, उपसंचालक, पशुसंगोपन खाते