सपना चौधरीचा बायोपिक येणार
मॅडम सपना असणार नाव
हरियाणाची प्रख्यात गायिका सपना चौधरी स्वत:च्या खास शैलीसाठी ओळखली जाते. सपनाने स्वत:च्या देशी नृत्याद्वारे जगभरात स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे. प्रत्येक जण सपनाच्या नृत्याचा चाहता आहे. कमी वयापासूनच सपनाने नृत्यात स्वत:ची कारकीर्द निर्माण केली होती. वडिलांचे निधन झाल्यावर तिनेच परिवाराची जबाबदारी उचलली होती. सपना चौधरीचे जीवन आता बदलून जाणार आहे.
प्रख्यात निर्माते महेश भट्ट हे सपनावर चित्रपट निर्माण करत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. सपनाने ‘मॅडम सपना’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. आयुष्य कधीच सोपे नसते, हे आम्ही सर्वजण जाणतो, परंतु आमचा संघर्ष, आमची लढाई, प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. जे लोक मला ओळखतात, त्यांना माझा प्रवास कधीच फुलांनी सजविलेला राहिला नसल्याचे माहित आहे. तरीही मी आज मजबुतीने उभी आहे, केवळ स्वत:साठी नव्हे तर ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला अशा सर्वांसाठी असे सपनाने नमूद केले आहे.
स्वत:ची कहाणी सांगण्याची वेळ आता आली आहे. शायनिंग सन स्टुडिओजकडून माझा प्रवास आता तुम्हा सर्वांसमोर खऱ्या स्वरुपात मांडला जाणार आहे. यावेळी देखील तुम्हा सर्वांच्या प्रेमाची गरज आहे. 2025 मध्ये ही कहाणी तुम्हा सर्वांसमोर येणार असल्याचे तिने म्हटले आहे. सपना चौधरीचा बायोपिक पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. सपना या बायोपिकसाठी अत्यंत उत्सुक आहे.