सीपीआरमध्ये जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर
कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रूग्णालयात (सीपीआर) जैव वैद्यकीय कचऱ्याचे ढीग पडून आहेत. विविध विभागामधुन वर्गीकरण केलेला जैव वैद्यकीय कचरा मोकळ्या जागेत टाकला केला आहे. याठिकाणी इतर कचरा व जैव वैद्यकीय कचरा एकत्र झाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून कचरा उठाव केला नसल्याचे येथील रूग्ण व नातेवाईकांनी सांगितले.
अपघात विभागाच्या पिछाडीसही जैव वैद्यकीय कचऱ्यांच्या पिशव्यांचे ढीग पडलेल्या आढळून येतात. याठिकाणी नागरिकांची कायम वर्दळ असते. पिशव्यामध्ये कापूस, सिरींज, सुया आदी साहित्य भरलेले असते. ते दिवसभर येथेच पडून असते. रूग्ण व नातेवाईकांना याची दुर्गंधी घेतच ये-जा करावी लागत आहे. जैव वैद्यकीय कचरा वर्गीकरण व उठावासाठी सीपीआर प्रशासनामार्फत खासगी कंपनीला ठेका दिला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक विभागातील जैव वैद्यकीय कचरा वेगळा करून उठाव केला जातो. कचरा वेगळा केला जात असला तरी उघड्यावर तसाच पडून राहीलेला असतो.
कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
ज्याठिकाणी सीपीआरचा इतर कचरा टाकला जातो. त्याठिकाणीच जैव वैद्यकीय कचरा आणून टाकला आहे. त्यामुळे सर्व कचरा एकत्र झाला आहे. कचरा उठाव करताना कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. त्यामुळे जैव वैद्यकीय कचऱ्यासह इतर कचऱ्याचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.