पराभव दिसू लागल्याने राजेश क्षीरसागर सैरभैर
कोल्हापूर :
शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर यांची पार्श्वभूमी ही गुंडगिरीचीच आहे. मतदानादिवशी शांततेत मतदान सुरू असताना त्यांनी टाकाळा येथे दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. कसबा बावडा येथे एका निष्ठावंत ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची गळपट्टी धरून धक्काबुकी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या शहरप्रमुखाने केला. क्षीरसागर यांच्या दादागिरीला जनतेनेच मतदनातून उत्तर दिले असुन पराभव समोर दिसत असल्याने ते सैरभर झाले असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याच्या कारणावरून शिवसेना ठाकरे गटाचे शहर उपाध्यक्ष राहुल माळी यांना कसबा बावडा येथे धक्काबुकी केली. यानंतर टाकाळा येथेही पैसेवाटपाचा प्रकार घडल्याने शिवसेना ठाकरे गट व शिंदे गटामध्ये वादावादी झाली होती. दोन्ही घटना क्षीरसागर यांच्या समोरच झाल्याने मतदारावर दबाव टाकण्यासाठीच असे प्रकार केले असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.
आमदार पाटील म्हणाले, क्षीरसागर यांनी डॉक्टर, बिल्डर यांच्याकडून हप्ते वसुलीसाठी केलेली मारहाण कोल्हापूरची जनता अद्याप विसरलेली नाही. शेजाऱ्यांना सुद्धा त्यांनी मारहाण, दडपशाही केली. यावेळी त्या कुटुंबानेही त्यांना चोख उत्तर दिले. मतदानाच्या दिवशी सुद्धा क्षीरसागर यांनी अंगरक्षकाला सोबत घेऊन काही प्रभागात पैसे वाटण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी त्याच भाषेत उत्तर देऊन तेथून पळवून लावले.
बावड्यामध्ये परिस्थिती हाताबाहेर जात होती. पण मी संयम ठेवून सामंजस्याने परिस्थिती हाताळून या संतप्त तरुणांना विनंती करून समजावून सांगितले. मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, याची काळजी घेतली. पण कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेल्या क्षीरसागर यांच्यासारख्या नेत्याने असे प्रकार करणे कितपत योग्य आहे? लोकांचा कल आपल्या विरोधात असल्याचे लक्षात आल्याने क्षीरसागर यांनी दिवसभर हे सर्व प्रयत्न केले असल्याची टीका त्यांनी केली.
मतदानादिवशी बावडा व टाकाळा येथे झालेल्या प्रकारावरून लोकांनी आपल्या अंगावर यावे आणि त्यातून आपल्याला सहानुभूती मिळावी, असा यामागे त्यांचा हेतू होता का? असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला. बावड्यात येऊन त्यांनी राहुल माळी या निष्ठावंत शिवसैनिकाला दादागिरी केली. त्यामुळेच मी या निष्ठावंत शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला. आणि यापुढेही सुद्धा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.