For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दूध उत्पादकांना दहा दिवसात बिले देणार

11:05 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
दूध उत्पादकांना दहा दिवसात बिले देणार
Advertisement

बेमूलच्या बैठकीत अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे आश्वासन : म्हशीचे दूध उत्पादनात बेळगाव जिल्हा राज्यात अग्रेसर

Advertisement

बेळगाव : बेळगाव येथे उच्च तंत्रज्ञानानेयुक्त मेगा डेअरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुकूल ठरणार आहे, असे बेळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष व अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. केपीटीसीएल सभागृहात सोमवारी जिल्हा दूध उत्पादक महामंडळाची 2023-24 सालासाठीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना भालचंद्र जारकीहोळी पुढे म्हणाले, बेळगाव दूध उत्पादक मंडळाची सुधारणा करण्याचा आपण संकल्प केला आहे. आम्ही साऱ्यांनी मिळून ही संस्था वाढवली पाहिजे, टिकवली पाहिजे. आपण अध्यक्ष झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या 60 टक्के समस्या जाणून घेतल्या आहेत. आणखी 40 टक्के समस्या समजावून घ्यायच्या आहेत.

उत्तर कर्नाटकातील दूध मंडळांना बघून बेंगळुरात हसत होते. रोज दोन लाख लिटर दूध संग्रह केले जाते. तरीही सुधारणा झाली नाही, असे ते म्हणत होते. दूध उत्पादकांना दहा दिवसात त्यांची बिले देण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. बेमूल सतत दूध पुरवठादार शेतकऱ्यांचा विचार करते. त्यांना आर्थिकरीत्या स्वावलंबी बनविण्यासाठी दूध व दुधाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देऊन ग्राहकांनाही उत्तम दर्जाचे उत्पन्न पुरवते. संपूर्ण राज्यात उत्तम संस्था बनविण्यासाठी श्रद्धेने काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Advertisement

जिल्ह्यात सध्या आठ ते नऊ लाख लिटर दूध जमा केले जात आहे. संपूर्ण राज्यात सर्वाधिक प्रमाणात म्हशीचे दूध बेळगाव जिल्ह्यातच उत्पादित केले जात आहे. दुधाच्या गुणवत्तेमुळे दरही चांगला मिळतो. 2023-24 मध्ये 648 दूध उत्पादक केंद्रांतून रोज सरासरी 1 लाख 72 हजार किलो दूध संग्रहित केले जाते. भविष्यात दूध उत्पादक संस्थांची संख्या 400 वर पोहोचविण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर असल्यामुळे अधिकाधिक प्रमाणात दूध महाराष्ट्रातील खासगी डेअऱ्यांनाही जात आहे. खासगी संस्थांच्या आमिषाला बळी न पडता बेमूलला दूध पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

चालू वर्षी दूधसंग्रह वाढला आहे. योग्य दराने ग्राहकांना वेळेत दूध पोहोचविण्यात येत आहे. अतिरिक्त दुधाची पावडर बनविण्यात येत आहे. संकटाच्या वेळीही आम्ही शेतकऱ्यांचे दूध नाकारले नाही. शेजारच्या महाराष्ट्र व गोव्यात नंदिनी दूध व दुग्धजन्य उत्पादनांचा पुरवठा वाढवण्यात येत आहे. बाजारपेठेत प्रिमियम, एफसीएम दूध व बकेटमधून दही विक्री सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांकडून त्याला उत्तम प्रतिक्रिया आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी वसतिगृह उभारण्यात आले असून प्रवेशासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी याचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहनही भालचंद्र जारकीहोळी यांनी केले आहे.यावेळी बेमूलचे संचालक विवेकराव पाटील, बाबू कट्टी, मल्लाप्पा पाटील, बाबुराव वाघमोडे, विरुपाक्ष इटी, रायाप्पा डूग, प्रकाश अंबोजी, महादेव बिळीकोरी, सविता खानाप्पगोळ, शंकर इटनाळ, सद्याप्पा वारी, रमेश अन्नीगेरी, संजय शिंत्रे, व्यवस्थापकीय संचालक कृष्णाप्पा एम. आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.