बाळांच्या नावांवर कोट्याधीश
पैसा मिळविण्यासाठी कोण कोणत्या युक्त्या शोधून काढेल, याची कल्पना करता येणेही अशक्य आहे. अमेरिकेत एक महिला बाळांची नावे सुचवून कोट्याधीश झाली आहे. टेलर के. हम्प्फ्री असे या महिलेचे नाव आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळांची नावे त्यांच्या पालकांना सुचविणे हा तिचा व्यवसाय आहे. त्यासाठी ती 26 लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारते, अशी माहिती देण्यात आली आहे. या महिलेने या व्यवसायाचा प्रारंभ 10 वर्षांपूर्वी केला. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर या महिलेचे लक्षावधी फॉलोअर्स आहेत. आज बाळांची नावे सुचवून ही महिला कोट्याधीश झालेली आहे. नावे सुचविण्याच्या तिच्या दोन योजना आहेत. बेसिक पॅकेज योजनेच्या अंतर्गत ही महिला साधारणत: 16 हजार रुपयांमध्ये काही नावांची सूची पालकांना ईमेलद्वारे पाठवून देते. तर दुसरी योजना अॅडव्हान्सड् पॅकेज ही आहे. या योजनेच्या अंतर्गत ही महिला प्रत्यक्ष चर्चा करुन विशिष्ट नावे सुचविते. या योजनेचे शुल्क 26 लाख रुपये इतके मोठे आहे. आजपर्यंत या महिलेने या दोन्ही योजनांच्या अंतर्गत 500 हून अधिक नावे सुचविली आहेत. केवळ बाळांची नावे सुचविण्यासाठी इतके पैसे कोण खर्च करणार, असा प्रश्न आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे. तथापी, अनेकांना आपल्या नवजात अर्भकाचे खूपच कौतुक असते. त्यामुळे त्याला योग्य नाव मिळावे, असे त्यांचे प्रयत्न असतात. तथापि, अनेक पालकांना नावांमधील वैविध्य आणि अर्थपूर्णता यांची फारशी माहिती नसते. त्यामुळे ते त्यांना सुचेल ते, किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरुन नाव ठरवून मोकळे होतात. ही महिला पालकांना अर्थपूर्ण नावांचे अनेक पर्याय सुचविते. त्यामुळे पालक आपल्या बाळाला वैशिष्ट्यापूर्ण नाव देऊ शकतात. त्यामुळे या महिलेचा व्यवसाय चांगला चालला आहे, असे समजते.