For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...दिनूचे बिल .....

01:00 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
   दिनूचे बिल
Advertisement

लहानपणी आम्हा सगळ्यांना अतिशय आवडणारी ही कथा. पण कलियुगात अशी आई पण नाही आणि निरागस दिनू पण नाही. आजच्या युगातला दिनेश नावाचा मुलगा त्याचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून एक मोठी हातभर यादी करून आई-बाबांकडे जातो. आई-बाबाही त्याला कौतुकाने दुकानात घेऊन जातात. एका मोठ्या मॉलमध्ये, सगळं त्याच्या आवडीचं. विविध वस्तू घेतल्यानंतर बिल देण्यासाठी ते काउंटर झाल्यानंतर तिथे काउंटर वरती एक मोठा फॉर्म त्याला दिला गेला. तो त्यानेच भरायचा होता. वाढदिवसा निमित्ताने ऑफर होती. हे त्यांनी आधीच सांगितलं होतं. त्याला वाटलं त्यासंदर्भातच काहीतरी असेल. तिथे त्या फॉर्मवरती लिहिलेलं होतं ......

Advertisement

हे बिल तुम्ही भरले का?

तू ज्या ज्या वस्तू घेतल्या आहेत त्या वस्तू निसर्गातून ज्या ज्या वृक्षांकडून शेताकडून आल्या आहेत त्यासाठी तू निसर्गाला काही परत दिलंस का? एखादं झाड तरी लावलंस का?  दुसरा प्रश्न होता आपण फळ खातो त्या बिया तू साठवल्यास का? त्या बियांचा योग्य वापर करून त्याच्यापासून रोपे बनवलीस का? तिसरा प्रश्न होता सौरशक्तीचा वापर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलास का?

Advertisement

चौथा प्रश्न होता गळणारे नळ, ग्लासामधलं अर्धवट वापरलेलं पाणी वाचवण्याचा प्रयत्न केलास का?  पाचवा प्रश्न होता खूप खरेदी करण्याआधी स्वत: जवळच्या जास्तीच्या वस्तू, जास्तीचे कपडे, खेळणी, गरजू मुलांना दिलीत का? आणि शेवटी ऑप्शन लिहिलेले होते, उत्तर होय असेल तर तुम्हाला सगळ्या वस्तू मोफत मिळतील आणि उत्तर नाही असेल तर खरेदी करता येणार नाही. त्याचा चेहरा अगदीच पडला कारण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं नाही म्हणून आली होती. त्याचा चेहरा रडवेला झाला... पण एकदम त्याच्या मनात काहीतरी विचार आला ..तो बाबांना म्हणाला, बाबा चला आपण दुसरीकडे जाऊया. आज वाढदिवस असल्यामुळे बाबा त्याच्या हो ला हो करत होते. शेवटी दिनेश निघाला आणि एका रोपवाटिकेमध्ये आला. आज मित्रांना रिटर्न गिफ्ट ही छोटी छोटी रोपं द्यायची हे त्यांनी निश्चित केलं होतं. घरी आईने जो खाऊ केलाय तोच आज मित्रांना पार्टी म्हणून खायला द्यायचा. वेगळं काही आणायचं नाही, हे ठरवलं. पुढच्याच एका छोट्या दुकानातून आपल्या कामवाल्या बाईंच्या मुलांसाठी खाऊ, खेळणी आणि अभ्यासाच्या वस्तू घेतल्या. आणि कामवाल्या मावशींच्या मुलांना घरी जाऊन दिल्या. त्याच्यामध्ये झालेला हा बदल पाहून त्यांना अतिशय आनंद होत होता. एरवी बिल किती येईल याची पर्वा न करणारा मुलगा निसर्गातल्या बिलाने शहाणा झाला होता. हे सगळं काम त्यांनी आज धडाक्यात सुरू केलं होतं. कुणीतरी सांगणारं भेटायला लागतं. तसंच काहीसं काम या एका प्रश्नावलीमुळे साधलं होतं. बाबांच्या लहानपणीची दिनूची गोष्ट पूर्ण झाली होती. आई-बाबा घरासाठी जे काही करतात त्याचं कुठलंच बिल ते मुलांना लावत नसतात. तसाच हा निसर्ग सगळ्यांना फक्त देत असतो. निसर्ग म्हणजे आपल्याला पोहणारे, पालन करणारे दुसरे आई-वडीलच की! ते इतकं आपल्याला देत असतात पण त्याचं बिल ते कधीच आपल्याला पाठवत नाहीत. त्याचे परिणाम मात्र जाणवतात. ते आपल्या लक्षात यायला हवं म्हणूनच दिनेशने सगळ्या मित्रांनाही सरळ सांगितले. निसर्गाला जे जे परत करता येईल त्या सगळ्या गोष्टी आवर्जून करू या. आज खऱ्या अर्थाने दिनूचे बिल चुकतं झालं होतं. नवीन विचार रोपांबरोबरच रूजणार होते. नव्या युगाची नवी गोष्ट आता सगळ्यांना सांगायलाच हवी. सगळी मुलं संध्याकाळी गावाबाहेरच्या टेकडीवर वृक्षारोपण करून आली. प्रत्येक झाडाला मुलांच्या नावाचे टॅग लागले होते. मुलांनी झाडं वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली .. झाडंसुद्धा आता या मुलांना आनंदाने पानं हलवून काहीतरी सांगत होती.......टाळ्या वाजवत होती....!

Advertisement
Tags :

.