जमैका अन् भारतादरम्यान द्विपक्षीय चर्चा
जमैकाचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर : जागतिक संस्थांमध्ये सुधारावर एकमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जमैकाचे पंतप्रधान एंड्य्रू होलनेस हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हैदराबाद हाउसमध्ये होलनेस यांची भेट घेतली आहे. यादरम्यान दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली आहे. जमैकाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याचा उद्देश व्यापार आणि गुंतवणुकीसमवेत अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आहे.
जमैकाच्या विकासयात्रेत भारत एक विश्वसनीय भागीदार राहिला आहे. कॅरेबियन देशासोबत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, जैवइंधन, नवोन्मेष्घ् आणि आरोग्यासमवेत अनेक क्षेत्रांमध्ये योगदान देण्यास भारत तयार आहे. होलनेस यांच्यासोबत जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली आहे. सर्व तणाव आणि वादांना चर्चेद्वारे सोडविले जाऊ शकते यावर आम्ही सहमती व्यक्त केली आहे. दोन्ही देश जागतिक शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दिशेने काम करणे सुरूच ठेवणार असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद समवेत सर्व जागतिक संस्थांमध्ये सुधार होणे आवश्यक असल्याबद्दल भारत आणि जमैकाचे एकमत आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात जमैकाच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या क्षमतानिर्मितीच्या दिशेने आम्ही काम करणार आहोत. संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, दहशतवाद हे दोन्ही देशांसमोर आव्हान ठरले आहेत. भारत-जमैका संबंध हा संयुक्त इतिहास, लोकशाहीवादी मूल्ये आणि लोकांदरम्यान मजबूत संबंधांवर आधारित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
भारतासोबत दृढ संबंधांची इच्छा
जमैकाचे पंतप्रधान एंड्य्रू होलनेस यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियरिंग, शिक्षण, डिजिटलायजेशन, सुरक्षा आणि ऊर्जा समवेत विविध क्षेत्रांमध्ये भारतासोबतचे सहकार्य मजबूत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारत स्वत:ला विश्वगुरु म्हणून प्रस्थापित करत आहे. आम्ही शिक्षण आणि डिजिटलायजेशमध्ये भारत सरकारकडून करण्यात आलेल्या उल्लेखनीय प्रगतीला जाणून आहोत. तांत्रिक प्रगतीचा एक प्रकाशस्तंभ म्हणून भारतासाठी शिकण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असे होलनेस यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सीमा सुरक्षा वाढविण्यासाठी भारताच्या तंत्रज्ञान-संचालित सुरक्षा उपाययोजनांमध्ये जमैकाची रुची असल्याचा उल्लेख केला आहे.
3 ऑक्टोबरपर्यंत भारत दौऱ्यावर
जमैकाचे पंतप्रधान हे 3 ऑक्टोबरपर्यंत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि जमैकाचे पंतप्रधान होलेस हे बहुपक्षीय बैठकांदरम्यान अनेकदा परस्परांना भेटले असल्याची माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे. होलनेस यांनी मंगळवारी राजघाट येथे जात महात्मा गांधी यांना पुष्पांलजी अर्पण केली आहे.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींना भेटणार
जमैकाचे पंतप्रधान होलनेस हे सोमवारी नवी दिल्लीत पोहोचले होते. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी विमानतळावर होलनेस यांचे स्वागत केले होते. या दौऱ्यादरम्यान होलनेस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना भेटणार आहेत. याचबरोबर भारतीय उद्योजकांसोबत ते संवाद साधणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान द्विपक्षीय सहकार्याला चालना देणारे अनेक करार होण्याची शक्यता आहे.
मजबूत द्विपक्षीय संबंध
भारत आणि जमैका यांच्यात मजबूत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. होलनेस यांच्या या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांना चालना मिळणार आहे. तसेच आर्थिक सहकार्य वाढण्यासोबत दीर्घकाळापासून चालत आलेले द्विपक्षीय संबंध मजबूत होण्याची अपेक्षा आहे.