अपघातात दुचाकीस्वार ठार
कारवार येथील घटना : एक जखमी
कारवार : थांबलेल्या बसला मोटारसायकलीने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला तर सहप्रवाशी जखमी झाल्याची घटना गुरुवारी येथील दिवेकर वाणिज्य महाविद्यालयासमोर राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर घडली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव मायकल मार्शल नरोन्हा (वय 42, रा. सदाशिवगड) असे आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव अरुण सुब्राय नाईक असे असून त्याला उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची कोडीबागहून कारवारकडे निघालेली बस येथील दिवेकर महाविद्यालया समोर थांबली होती. त्यावेळी सदाशिवगडहून कारवारकडे निघालेल्या मोटारसायकलला अन्य एका वाहनाने जोराची धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलने थांबलेल्या बसला जोराची धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला तर सहप्रवाशी जखमी झाला. अपघातावेळी येथे जोरदार पाऊस पडत होता. कारवार वाहतूक पोलीस अधिक तपास करत आहेत.