For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टिप्परच्या धडकेत सांबऱ्याचा दुचाकीस्वार ठार

06:58 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
टिप्परच्या धडकेत सांबऱ्याचा दुचाकीस्वार ठार
Advertisement

बसवन कुडचीजवळ तपासनाक्यानजीक अपघात :  टिप्पर चालकाचे पलायन

Advertisement

   सांबरा/ वार्ताहर

भरधाव जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सांबरा येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बसवन कुडचीजवळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासनाक्यानजीक शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली. शिवगौडा रामगौडा देसाई (वय 58) राहणार चावडी गल्ली, सांबरा असे या अपघातात मयत झालेल्या दुर्देवी दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Advertisement

शिवगौडा देसाई हे सांबराहून फरशी आणण्यासाठी बेळगावकडे जात होते. बसवन कुडचीनजीक असलेल्या चेकपोस्ट समोरील बॅरिकेड्स पाहून त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या केए 22 डी 3859 क्रमांकाच्या टिप्परने त्यांना जोराची धडक दिली. यात ते रस्त्यावर कोसळले. त्यानंतर टिप्पर अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  अपघातानंतर टिप्पर चालकाने पलायन केले असून माळमारुती पोलीस अधिक तपास करत आहेत.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मे महिन्यामध्ये सांबरा येथील महालक्ष्मी यात्रा होणार आहे. यात्रेनिमित्त गावामध्ये घरांची दुरुस्ती व नवीन घरांचे बांधकाम जोरात सुरू आहे. शिवगौडा देसाई यांच्या घरीही फरशी बसवण्याचे काम सुरू आहे. ते फरशी आणण्यासाठी बेळगावकडे चालले होते. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे सांबरा गावावर शोककळा पसरली आहे.

अपघाताची माहिती मिळताच माळमारुती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला पाठविण्यात आला. सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व तीन भाऊ असा परिवार आहे.

 धोकादायक बॅरिकेड्स हटविण्याची मागणी

मे महिन्यामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. बसवण कुडचीनजीकही वाहनांची तपासणी करण्यासाठी चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. चेकपोस्टसमोर रस्त्याच्या दुतर्फा चुकीच्या पद्धतीने बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अपघात होण्याचा जास्त धोका वाढला आहे. या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. उतरतीच्या रस्त्यावरच चेकपोस्ट असल्याने येथे अपघात होण्याचा जास्त धोका वाढला आहे. त्यासाठी तेथील चेकपोस्ट इतरत्र हलविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

Advertisement
Tags :

.