टेम्पोस पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार
टेम्पो चालकाविरूध्द सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सांगली प्रतिनिधी
कोणताही दिशादर्शक फलक किंवा रिफलेक्टर न लावता रस्त्यावर लावण्यात आलेल्या टेम्पोला पाठीमागून धडकून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी 22 सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास मिरज ते अंकली रस्त्यावर झाला. अपघातात प्रदीप प्रमोद कांबळे (24, रा. चिप्री, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हा ठार झाला. पोलिसांनी याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार गोविंद आंबाण्णा कदम यांनी फिर्याद दिली आहे.
या अपघाताची अधिक माहिती अशी, संशयित चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो (क्र. एमएच 15 इजी 1051) हा मिरज ते अंकली मुख्य हमरस्त्याच्या कडेला पार्किंग नसलेल्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास उभा केला होता. परिसरात बऱ्यापैकी अंधार असल्याने चटकन टेम्पो थांबला असल्याचे दिसत नव्हते. चालकाने टेम्पोला कोणताही दिशादर्शक फलक किंवा रिफलेक्टर लावलेला नव्हते. त्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या प्रदीप कांबळे हा दुचाकीवरून (क्र. एमएच 09 डीके 7451) परिसरात आला. त्यास टेम्पो न दिसल्याने त्याच्या दुचाकीची धडक टेम्पोस बसली. यामध्ये प्रदीप कांबळे यास गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. दोन्ही वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत.