For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भरधाव ट्रकच्या ठोकरीने दुचाकीस्वाराचा बळी

06:15 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
भरधाव ट्रकच्या ठोकरीने दुचाकीस्वाराचा बळी
Advertisement

नातीला शाळेवरून आणताना तिसऱ्या रेल्वेगेटजवळ अपघात

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने जोशी गल्ली, शहापूर येथील निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी तिसऱ्या रेल्वेगेटजवळ हा अपघात घडला. शाळेतून आपल्या नातीला घरी घेऊन जाताना ही घटना घडली असून अपघातात नातही किरकोळ जखमी झाली असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Advertisement

फ्रान्सिस मुरगेश अँथोनी (अनुराग वेरेकर) (वय 69) रा. जोशी गल्ली, शहापूर असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. ते उत्तम गायक म्हणूनही परिचित होते. हिंदी गाण्यांबरोबरच गीतरामायणही सादर करत होते. पणजी येथील आकाशवाणीवरही त्यांनी अनेक वर्षे संगीत सेवा दिली आहे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

शनिवारी आपली नात देवना (वय 14) हिची शाळा सुटल्यानंतर तिला घेऊन आपल्या दुचाकीवरून फ्रान्सिस घरी जात होते. तिसऱ्या रेल्वेगेटजवळ भरधाव ट्रकची पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच असलेल्या खासगी इस्पितळात हलविण्यात आले. त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदेवप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवारी दुपारी 12.40 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. फ्रान्सिस यांच्या पश्चात मुलगा, दोन विवाहित कन्या व नातवंडे असा परिवार आहे. संगीत व आपल्या आवाजामुळे त्यांनी मोठा मित्रपरिवार जोडला होता. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करून ट्रक ताब्यात घेतला आहे.

Advertisement
Tags :

.