For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिजगर्णीच्या सुपुत्राने हायस्कूलमध्ये केली वीजपुरवठ्याची सोय

10:15 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिजगर्णीच्या सुपुत्राने हायस्कूलमध्ये केली वीजपुरवठ्याची सोय
Advertisement

योगेश निलजकर या तरुणाचा उपक्रम : शिक्षणप्रेमींतून कौतुक, यापुढेही मदत करण्याची इच्छा

Advertisement

वार्ताहर /किणये

बिजगर्णी गावातील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये गेल्या 38 वर्षांपासून विद्युत पुरवठा नव्हता. गावातील एका उच्चशिक्षित तरुणाने या हायस्कूलमध्ये विद्युत पुरवठा सुरू केला आहे. यामुळे या हायस्कूलमध्ये गेल्या कित्येक वर्षांनंतर प्रकाश दिसला आहे. योगेश अर्जुन निलजकर असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिकांतून त्याचे कौतुक होत आहे. पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी परिसरातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण घेता यावे, या उद्देशाने गावात न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना 1986 साली करण्यात आली. या हायस्कूलमध्ये सध्या विद्यार्थ्यांची पटसंख्याही बऱ्यापैकी आहे. तसेच शिक्षणही चांगल्या पद्धतीचे देण्यात येते. मात्र या हायस्कूलमध्ये विद्युत पुरवठाच नव्हता. यामुळे विद्युत उपकरणे सुरू करताना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बराच त्रास सहन करावा लागत होता. तसेच विद्युत पुरवठा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. बिजगर्णी गावचे सुपुत्र योगेश निलजकर हे सध्या अमेरिका येथील एका नामांकित कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.आपण चांगले शिक्षण घेतलेले आहे आपल्या गावातील हायस्कूलसाठीही आपल्याकडून काहीतरी हातभार लागावा, या उद्देशाने योगेश यांनी सुमारे 50 हजार रुपये खर्च करून हायस्कूलमध्ये विद्युत पुरवठा सुरू करून दिला आहे. हेस्कॉमसाठी लागणारे डिपॉझिट, वायरिंगचा खर्च, बोर्ड बसविणे, बल्ब आदींसाठी मिळून त्यांनी हा खर्च केला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वीच या विद्युत पुरवठ्याचा विविध मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. एस. एस. जाधव, अर्जुन निलजकर, पी. पी. बेळगावकर, वाय. एच. पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते स्विच ऑन करून विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. हायस्कूलमध्ये विद्युत पुरवठा सुरू केल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक वर्गातून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

शैक्षणिक कार्यास हातभार

पश्चिम विभाग शिक्षण मंडळाच्या माध्यमातून आमच्या बिजगर्णी गावात या हायस्कूलची स्थापना करण्यात आली आहे. या हायस्कूलच्या स्थापनेमध्ये माझे वडील अर्जुन निलजकर यांचा मोलाचा वाटा आहे. ते आजही या हायस्कूलसाठी नेहमी कार्यरत असतात. त्यांची धडपड आणि तळमळ पाहून मीही माझ्या गावातील हायस्कूलसाठी काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने 50 हजार रुपये खर्च करून हा विद्युत पुरवठा सुरू करून दिलेला आहे. यापुढेही हायस्कूलमधील होतकरू विद्यार्थ्यांसाठी मी मदत करीत राहणार आहे. शैक्षणिक कार्यामध्ये हातभार लावल्यास एक वेगळेच समाधानही मिळते.

 - योगेश निलजकर

Advertisement
Tags :

.