बिजगर्णी ग्रा. पं.तर्फे शिवाराकडे जाणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय
शिवारातील कुटुंबीय-डोंगरभागाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांमधून समाधान
वार्ताहर/किणये
बिजगर्णी गावातील काही नागरिकांची घरे शेत शिवारात आहेत. तसेच गावातील नागरिक डोंगरभागातील आपापल्या शिवाराकडे जातात. या शिवाराकडे जाणाऱ्या लोकांसाठी व शेतशिवारात असलेल्या कुटुंबीयांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बिजगर्णी ग्रामपंचायतच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. गावातील शिवारात असलेल्या कुटुंबीयांना तसेच डोंगरभागाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. नुकताच गावातून पाईपलाईनद्वारे शिवाराकडे जात असलेल्या बिजगर्णी गावाजवळील मोरे कुटुंबीयांसाठी तसेच जानेवाडी रोडजवळ असलेल्या भास्कर व मोरे कुटुंबीयांसाठी व शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पाईपलाईन कामकाजाच्या पूजनप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्षा रेखा नाईक, माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, संदीप अष्टेकर, महेश पाटील, संतोष कांबळे, बबलू नावगेकर, शितल तारीहाळकर, चंद्रभागा जाधव व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पुंडलिक जाधव यांनी केले. पाण्याची टाकी उभारून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केल्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.