बिजगर्णी ग्रामपंचायतीची इमारत होणार हायटेक
नूतन इमारतीचा स्लॅबभरणी सोहळा उत्साहात
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील बिजगर्णी ग्रामपंचायतीची इमारत नव्याने बांधण्यात येत आहे. ही इमारत सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध होणार असून हायटेक इमारत होणार आहे. या इमारतीचा स्लॅबभरणी सोहळा शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. उपाध्यक्ष अॅड. नामदेव मोरे हे होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून ग्रा. पं. माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर हे होते. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते स्लॅबभरणी पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलन यल्लाप्पा बेळगावकर, निंगाप्पा जाधव, निंगाप्पा मोरे, परशराम भास्कर, अब्दुल नावगेकर, विलास पाटील, परशराम पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले.
पुन्हा 30 लाखाचा निधी मंजूर करणार
या भागातील ही सर्वात सुसज्ज अशी ग्रामपंचायतीची इमारत होणार असून यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य एकजुटीने कार्य करत आहेत. याचबरोबर या भागाच्या विकासासाठीसुद्धा प्रयत्न करण्यात येत आहेत, असे चन्नराज हट्टीहोळी यांनी आपल्या भाषणातून सांगितले. पुन्हा या ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 30 लाखाचा निधी आपण मंजूर करणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या समोर गार्डन बनवून देण्यासाठी आपण मदत करणार असल्याचेही हट्टीहोळी यांनी सांगितले.
दुमजली इमारत होणार
महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून सदर इमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे. इंदिरानगर बिजगर्णी या ठिकाणी सदर इमारत बांधण्यात येत असून ही पूर्ण ग्रामपंचायतची इमारत असणार आहे. दुमजली इमारत होणार असून या ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये अत्याधुनिक सुविधा, डिजिटल तसेच वेगवेगळे कक्ष बनविण्यात येणार आहेत. मोठा सभागृह होणार आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांसाठी मीटिंग हॉल बांधण्यात येणार आहे. याचबरोबर विशेष ग्रंथालय बनविण्यात येणार आहे. त्यामुळे या नूतन इमारतीची साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
सदर इमारतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतमधील सर्व कामे एकत्र करता येतील. याचबरोबर राष्ट्रीय बँक तसेच स्त्रा-शक्ती संघासाठी सुद्धा या ठिकाणी जागा देण्याचा आमचा संकल्प आहे, असे अॅङ नामदेव मोरे यांनी बोलताना सांगितले. यावेळी पीडिओ रविकांत सी. एम., ग्रामपंचायत सदस्य संदीप अष्टेकर, मेहबूब नावगेकर, महेश पाटील, अप्पू कांबळे, लक्ष्मी पाटील, शितल तारीहाळकर, चंद्रभागा जाधव,गायत्री सुतार, मनीषा सुतार, मंजुळा कांबळे, सागर नाईक आदींसह बिजगर्णी, कावळेवाडी, येळेबैल, राकसकोप या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पुंडलिक जाधव यांनी तर अशोक कांबळे यांनी आभार मानले.