बिजगर्णी ग्रामपंचायत इमारत होणार हायटेक
विविध कार्यालये एकाच छताखाली : दुसऱ्या मजल्याच्या कामकाजाला सुरुवात
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या पश्चिम भागातील बिजगर्णी ग्रामपंचायतीची इमारत हायटेक होणार आहे. बिजगर्णी येथील इंदिरानगर येथे दुमजली इमारत बांधण्यात येणार असून, दुसऱ्या मजल्याच्या कामकाजाला नुकतीच सुरुवात केली आहे. इमारतीच्या कामकाजाचे पूजन ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा नाईक व उपाध्यक्ष नामदेव मोरे, माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या विशेष विकास निधीतून 40 लाख रुपयांत बांधकाम उभारण्यात येणार आहे. तालुक्यातील एक सुसज्ज आणि अद्ययावत ग्रामपंचायत इमारत म्हणून याची ओळख असणार आहे. लवकरच लोकार्पण समारंभ महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार असल्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर यांनी सांगितले.
वाचनालय सुरू करणार
या नव्या इमारतीत विविध कार्यालयांसह वाचनालय सुरू करण्यात येणार असून, ग्रामस्थांसाठी उपयुक्त सुविधा उपलब्ध होणार आहेत. ग्रामपंचायतच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. या इमारतीसाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विशेष सहकार्य केले आहे असे सदस्याने सांगितले. दुसऱ्या मजल्याच्या इमारतीत विविध प्रकारची कार्यालय उभारण्यात येणार आहेत. या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. पूजनप्रसंगी सदस्य महेश पाटील, संतोष कांबळे, चंद्रभागा जाधव, शीतल तारिहाळकर, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.