For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजापूर सीईएनकडून पाच मोठ्या गुन्ह्यांचा छडा

12:25 PM Mar 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
विजापूर सीईएनकडून पाच मोठ्या गुन्ह्यांचा छडा
Advertisement

गुन्हेगारांची खाती गोठवून करोडो रुपयांसह मुद्देमाल हस्तगत : जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची माहिती

Advertisement

बेळगाव : सायबर गुन्हेगारीचे प्रकार वाढत चालले आहेत. गुन्हेगारीच्या तुलनेने तपासाचे प्रमाण कमीच आहे. विजापूर येथील सीईएन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र तेराहून अधिक सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून पाच गुन्ह्यांचा छडा लावला आहे. सुमारे अडीच कोटी रुपये संबंधितांना परत करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीसप्रमुखांसमवेत अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शंकर मारिहाळ, रामनगौडा हट्टी, सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कांबळे, पोलीस निरीक्षक रमेश आवजी आदींसह अनेक अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी पाच प्रमुख गुन्ह्यांचा छडा लावल्याचे पोलीसप्रमुखांनी सांगितले. विजापूर जिल्ह्यातील एका कंत्राटदाराला CAPEX.COM या ट्रेडिंग अॅप्लिकेशनमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा 30 टक्के नफा देण्याचे सांगून 1 कोटी 88 लाख रुपये जमा करून घेण्यात आले होते. नफा तर नाहीच, गुंतवणूक केलेली रक्कमही मिळत नाही म्हणून संबंधित कंत्राटदाराने विजापूर येथील सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला होता.

याप्रकरणी दोघा जणांना अटक करून त्यांची बँक खाती गोठवण्यात आली असून 1 कोटी 26 लाख 34 हजार 645 रुपये जप्त करण्यात आले आहेत. विजापूर जिल्ह्यातील ताळिकोटी येथील राजकन्या बसवराज कोंगंडी यांचीही फसवणूक करण्यात आली होती. CAPITALIX या ट्रेडिंग अॅप्लिकेशनमध्ये गुंतवणूक केल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलर, गोल्ड, क्रूड ऑईल, करन्सी पेपर, बिटकॉईनच्या माध्यमातून व्यवहार करून दरमहा 30 लाख रुपये नफा देण्याचे सांगून 87 लाख रुपये जमा करून घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी आठ जणांना अटक करून त्यांच्याजवळून 68 लाख 25 हजार 710 रुपये जप्त करून राजकन्या यांना परत करण्यात आले आहेत. उर्वरित 18 लाख रुपयेही जप्त करण्यात आल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.

Advertisement

रेल्वेत नोकरी देण्याचे सांगून 13 जणांकडून 1 कोटी 61 लाख रुपये वसूल करण्यात आले होते. बबलेश्वर तालुक्यातील सिकंदर महम्मद बसरगी, रा. नागराळ व झारखंड आणि दिल्ली येथील आरोपींनी ही फसवणूक केली होती. पैसे घेतल्यानंतर बनावट नियुक्तीपत्रही देण्यात आले होते. बनावट ओळखपत्र तयार करून देऊन या सर्व तेरा जणांना रांची-झारखंडजवळ बोलावून घेण्यात आले. तीन-चार महिने तुम्हाला येथेच रहावे लागणार आहे, असे सांगत नंतर जो अधिकारी नोकरी देणार होता, त्याला सीबीआयने अटक केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला नोकरी मिळणार नाही, गावी परत जा, असे सांगत त्यांची फसवणूक करण्यात आली होती. सिकंदर बसरगीला अटक करून 45 लाख रुपये जप्त करण्यात आले असून दिल्ली व झारखंडमधील आणखी तिघा जणांचा शोध घेण्यात येत आहे.

विजापूर येथील एका व्यापाऱ्याला THE OCTATRADING अॅपमध्ये गुंतवणूक केल्यास रोज 4 टक्के नफा देण्याचे सांगून 2 कोटी रुपये जमा करून घेण्यात आले होते. नंतर नफा तर नाहीच, गुंतवलेली रक्कमही परत केली नाही. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन त्यांची बँक खाती गोठवून 38 लाख रुपये संबंधित व्यापाऱ्याला परत करण्यात आले आहेत. आता आणखी 32 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

बसवन बागेवाडी येथील सोहेलअहमद अब्दुलरजाक कोरबू यांच्या मुलाला नीट परीक्षेत एमबीबीएस प्रवेशासाठी आवश्यक गुण मिळाले नसले तरी एमबीबीएसमध्ये प्रवेश देण्याचे सांगून 39 लाख 65 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शमसुद्दीन राजेसाब कक्केरी, रा. विजापूर, महम्मद अकिब जावेद, रा. गुलबर्गा या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अतेशाम, रा. गुलबर्गा हा फरारी असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मोहम्मद अकिबचा शोध घेण्यासाठी लुटआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दुबईला जाताना मुंबई विमानतळावर त्याला अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले. याप्रकरणी 26 लाख 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. पाच प्रमुख गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावणाऱ्या सीईएन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी कौतुक केले आहे.

Advertisement
Tags :

.