महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बीडचे बिहारीकरण

06:43 AM Dec 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर सध्या गाजत आहे. या हत्येचे धागेदोरे बीडमधील खंडणी रॅकेटशी असल्याचे समोर आले असून, संपूर्ण जिल्हाच गुन्हेगारांनी  पोखरल्याचे दिसून येते. वास्तविक, महाराष्ट्रातील मराठवाडा हा प्र्रांत राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग मानला जातो. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातलाच बीड हा एक जिल्हा. काँग्रेसच्या मातब्बर नेत्या केशरकाकू क्षीरसागर, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडला नवी ओळख मिळाली. तथापि, मागच्या काही दिवसांपासून खून, मारामाऱ्या, महिलांवरील अत्याचार, खंडणी यामुळे बीड चर्चेत आले आहे. केज तालुक्यातील मस्साजोग हे गाव तर कालपरवापर्यंत कुणाला माहीतच नव्हते. मात्र, या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने हे गाव देशाच्या नकाशावर पोहोचले आहे. देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते. सरपंच म्हणून तीन टर्म त्यांनी अतिशय चांगले काम केले. आपले गाव समृद्ध व्हावे, गावकऱ्यांचे जीवनमान उंचावे, हा त्यांचा ध्यास असे. मात्र, पवनचक्कीच्या  खंडणी रॅकेटने त्यांचा बळी घेतल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. मराठवाड्याच्या अनेक भागांत पवनचक्क्यांची कामे सुरू आहेत. मात्र, या कंपन्यांकडून मोठ्या रकमेची खंडणी उकळणारे रॅकेट जिल्ह्यामध्ये सक्रिय असल्याचे पहायला मिळते. मस्साजोग प्रकरण याच खंडणीखोरांभोवती फिरत आहे. याप्रकरणी राज्याचे अन्नधान्य व पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यासह सरपंच हत्याप्रकरणातील सुदर्शन घुले आणि राष्ट्रवादीचा तत्कालीन तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खंडणी आणि हत्या हे दोन्ही गुन्हे वेगळे भासत असले, तरी प्रत्यक्षात ते एकमेकांशी संबंधित आहेत. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही गुन्ह्यातील प्रमुख आरोपी हे अद्यापही फरार दिसतात. त्यामुळे संबंधितांच्या अटकेच्या मागणीकरिता मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. तर सर्वपक्षीय मंडळीही एकवटल्याचे दुर्मीळ चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय आता आणखी खोलात गेल्याचे दिसते. मागच्या काही दिवसांपासून भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात रान उठवले आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हे प्रकरण लावून धरले आहे. मुंडे आणि कराड यांच्यातील आर्थिक व्यवहार, एकत्रित जमीन खरेदी, मुंडेंसह त्यांच्या मित्रमंडळींची पिस्तूलबाजी आदी बाबी दमानिया यांनी पुराव्यासह समोर आणल्या आहेत. त्यामुळे मंत्री मुंडे चांगलेच अडचणीत आलेले दिसतात. बीडमध्ये धनंजय मुंडे यांचे वडील पंडितअण्णा मुंडे यांच्या नावाने बाजार समितीचे गाळे बांधले गेले. मात्र, जागा वेगळी व बांधकाम वेगळ्या ठिकाणी झाल्याचा आरोप धस यांनी केला आहे. तर याच सिरसाळा गावातील मंदिराची जमीन हडपणे, शासकीय निधीतून 30 कोटींचे बंधारे स्वत:च्या शेतात बांधणे, परळीत थर्मल राख वाहतुकीतून कोट्यावधी ऊपये कमावणे, असेही आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे हे आरोप काही विरोधी पक्षातील नेत्यांकडून झालेले नाहीत. मुंडे हे राष्ट्रवादी दादा गटाचे, तर धस भाजपचे. हे बघता संशयाचे धुके अधिक गडद होते. इतकेच नव्हे, तर अजितदादा गटाचे नेते प्रकाश सोळंके हेदेखील आरोपाचे किटाळू दूर होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा देणे योग्य ठरेल, असे म्हणतात. स्वराज्य पक्षाचे नेते छत्रपती संभाजीराजे यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, ठाकरे सेनेचे संजय राऊत, काँग्र्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्यासह शिंदे गटानेही हीच मागणी लावून धरली आहे. ही सर्वपक्षीय कोंडी फोडणे, ही मुंडे यांच्याकरिता सोपी बाब नसेल. एकेकाळी गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरून धनंजय राजकारणात आले. भाजपकडून त्यांना विधान परिषदेवरही संधी देण्यात आली. मात्र, काकांशी नेतृत्वावरून मतभेद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी परळीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव केला. तेव्हापासून धनंजय यांची गाडी सुसाट सुटली आहे. अलीकडे संपूर्ण जिल्ह्याची सूत्रे आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सरत्या विधानसभा निवडणुकीतही ते विक्रमी मतांनी निवडून आले. मात्र, त्यांची एकूण कार्यपद्धती वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसते. वाल्मिक कराडला अटक होत नाही आणि मुंडेंना अटक होत नाही, तोवर बीड सोडणार नसल्याची  भूमिका दमानिया घेतात. तर मराठा समाजही रस्त्यावर उतरून मुंडेंच्या मागणीसाठी आक्रमक होतो. हा वाढता दबाव सरकारच्या प्रतिमेवरही परिणाम करू शकतो. बीडमधील एकूण परिस्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नाराज आहेत. गृहमंत्री या नात्याने येथील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ते अॅक्शन मोडवर  आहेत. वाल्मीक कराडची बँक खाती गोठवणे, हा त्याचाच पहिला टप्पा. या सगळ्या साफसफाईत मुंडे यांच्या मंत्रिपदाचा बळी जाण्याची शक्मयता नाकारता येणार नाही. राजकीय जीवनात साधनशुचितेला आणि चारित्र्याला अतिशय महत्त्व आहे. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या राजकारण्यांचा अशा शुद्ध राजकीय आचरणावरच भर असे. यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखविण्याचे काम केले. काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, सेना, जनसंघ-भाजप किंवा इतर पक्ष असतील. या पक्षातील नेत्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून नवा वस्तूपाठ आखून दिला. मात्र, मागच्या काही वर्षांत शहरापासून खेड्यापर्यंत  राजकारणाचे गजकरण पसरलेले दिसते. राजकारणी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी सर्व अवकाश व्यापला असून, त्याची झळ सर्वसामान्य माणसाला बसत असल्याचे दिसून येते. बीड त्याचेच उदाहरण. आता हे बिहारीकरण रोखण्यासाठी सरकारला ठोस पावले उचलावीच लागतील.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article