For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सूर्यवंशीच्या नाबाद शतकानंतरही बिहार पराभूत

06:33 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
सूर्यवंशीच्या नाबाद शतकानंतरही बिहार पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

Advertisement

2025 च्या क्रिकेट हंगामातील सुरू असलेल्या मुश्ताकअली चषक टी-20 स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या इलाइट ब गटातील सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या नाबाद शतकानंतरही बिहारला महाराष्ट्राकडून पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राने हा सामना 3 गड्यांनी जिंकला.

या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून बिहारला प्रथम फलंदाजी दिली. बिहारने 20 षटकांत 3 बाद 176 धावा जमविल्या. त्यानंतर महाराष्ट्राने 19.1 षटकांत 7 बाद 182 धावा जमवित विजय नोंदविला. बिहारच्या डावामध्ये 14 वर्षीय सलामीचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 61 चेंडूत 7 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 108 धावा झोडपल्या. मुश्ताकअली चषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकविणारा वैभव हा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू ठरला आहे. सूर्यवंशीने बिहारतर्फे टी-20 प्रकारात सर्वाधिक षटकार नोंदविण्याचा विक्रम केला आहे. सूर्यवंशीने आयुष लोहारुकासमवेत चौथ्या गड्यासाठी 75 धावांची भागिदारी केली. लोहारुकाने नाबाद 25 धावा केल्या. रायजिंग स्टार्स आशिया स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात विरुद्ध खेळताना वैभव सूर्यवंशीने 42 चेंडूत 144 धावांची वादळी खेळी केली होती. महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात वैभवने शेवटच्या षटकातील अर्शिन कुलकर्णीच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर चौकार ठोकवून आपले शतक पूर्ण केले. महाराष्ट्रातर्फे राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी आणि ओसवाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

प्रत्युत्तरादाखल खेळताना महाराष्ट्राच्या डावामध्ये सलामीच्या पृथ्वी शॉने 30 चेंडूत 66 धावा झोडपल्या. निरज जोशीने 30, रणजीत निकमने 27, निखिल नाईकने 22 धावा जमविल्या. महाराष्ट्राने हा सामना 5 चेंडू बाकी ठेवून जिंकला. बिहारतर्फे मोहम्मद इझार, सकीबुल गणी यांनी प्रत्येकी 2 तर शकीब हुसेन, सुरज काश्यप आणि खलिद आलम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : बिहार 20 षटकांत 3 बाद 176 (वैभव सूर्यवंशी 108, लोहारुका नाबाद 25), महाराष्ट्र 19.1 षटकांत 7 बाद 182 (पृथ्वी शॉ 66, निरज जोशी 30, रणजीत निकम 27, निखिल नाईक 22).

Advertisement
Tags :

.