बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नि:संदिग्ध घोषणा, महागठबंधनवर घणाघात, प्रचाराचा अधिकृत प्रारंभ
वृत्तसंस्था / समस्तीपूर (बिहार)
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेच आहेत आणि असतील, अशी नि:संदिग्ध घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यांनी शुक्रवारी समस्तीपूर येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला आहे. आघाडीच्या कार्यकाळात आम्ही ‘जंगलराज’ संपुष्टात आणले आहे. बिहारची जनता पुन्हा ते राज्य कधीच येऊ देणार नाही. बिहारचा मतदार नेहमीच विकासासाठी मतदान करत राहील, असा विश्वास त्यांनी येथील विराट जाहीर सभेत भाषण करताना व्यक्त केला. नितीश कुमारही यावेळी उपस्थित होते.
‘नयी रफ्तारसे चलेगा बिहार, जब फिरसे आयेगी एनडीए सरकार’ अशी घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिली. समस्तीपूर आणि मिथिला भागातील विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आपण भारावलो असल्याचे त्यांनी भाषणात विशद केले.
महागठबंधनवर टीकेचे आसूड
बिहारचे दिवंगत मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या राजकारणाचा आणि विकासवादी दृष्टीकोनाचा वारसा चोरण्याचे कार्य राज्यातील काही पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी हाती घेतले आहे. तथापि, बिहारची जनता हे त्यांचे कारस्थान कधीही यशस्वी होऊ देणार नाही. 2005 पूर्वीच्या जंगलराजचा बिहारच्या लोकांना चांगलाच अनुभव आहे. त्या प्रकारचे कुप्रशासन बिहारचा मतदार पुन्हा कधीच येऊ देणार नाही. गेल्या दोन दशकांमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारने राज्याला अन्याय आणि अत्याचार यांच्यापासून मुक्ती दिली आहे. हेच कार्य आम्ही पुन्हा निवडून आल्यानंतर पुढे नेणार आहोत. यासाठी आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवे आहेत. ते आम्हालाच मिळतील याची निश्चिती आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसमुदायासमोर केले.
नेते नितीश कुमारच
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बिहारमधील नेते मुख्यमंत्री नितीश कुमारच आहेत आणि यापुढेही असतील, अशी स्पष्ट घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसभेत केली आहे. गुरुवारी महागठबंधनच्या बैठकीत तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून घोषणा करण्यात आली होती. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा चेहरा कोण आहे, अशी विचारणाही करण्यात आली होती. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नाचे नि:संदिग्ध उत्तर जनसमुदायासमोरच दिले आहे.
घोटाळेबाजांना हाणून पाडा
सत्तेवर असताना अनेक घोटाळे केलेले लोक आज पुन्हा सत्तेवर येऊ इच्छित आहेत. त्यांच्यापैकी अनेकजण आज विविध प्रकरणांमध्ये जामिनावर बाहेर आहेत. अशा लोकांना बिहारची जनता पुन्हा सत्तेवर येण्याची संधी कधीच देणार नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सत्ताकाळात आम्ही बिहारचा खऱ्या अर्थाने विकास घडविला आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती घडवून आणली आहे. बिहारच्या मतदाराला याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार निवडून आणण्याचा निर्धार या मतदारांनी केला आहे. आमचा विजय निश्चित आहे, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
दोन टप्प्यांमध्ये मतदान
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्याच्या विधानसभेत एकंदर 243 जागा आहेत. त्यांच्यापैकी 121 मतदारसंघांमध्ये 6 नोव्हेंबरला, तर 122 मतदारसंघांमध्ये 11 नोव्हेंबरला मतदान होणार असून 14 नोव्हेंबरला मतगणना होणार आहे.
विजयाचा विश्वास व्यक्त...
ड बिहारमध्ये पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार येण्याचा विश्वास
ड गेल्या 20 वर्षांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात जंगलराजपासून मुक्ती
ड बिहारची जनता विकासाची पक्षधर, अन्यायी राज्याची पुन्हा स्थापना अशक्य
ड कर्पुरी ठाकूर यांच्या स्वप्नातील बिहार साकारण्याची क्षमता केवळ आमच्यात