फोंड्यात एक लाखाचा गांजाप्रकरणी बिगरगोमंतकीयाला अटक
फोंडा : अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी एका बिगरगोमंतकीय युवकांना फोंडा पोलिसांनी अटक केली. विनय मुर्गेश हेब्बल (25, रा. मेस्तवाडा कुर्टी, मूळ कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 1 किलो वजनाचा सुमारे एक लाख रूपये किमतीचा गांजा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला. शनिवारी उशिर रात्री सपना पार्क बेतोडा येथील एका हॉटेलजवळ ही कारवाई करण्यात आली. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सपना पार्क येथील एका हॉटेलजवळ अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार फोंडा पोलिसांनी सापळा रचून ही धडक कारवाई केली. संशयिताकडून साधारण 1 किलोग्रम वजनाचा गांजा अमलीपदार्थ ताब्यात घेण्यात आले. निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य वेळीप, आदित्य नाईक गावकर, हवालदार केदारनाथ जल्मी, देविदास पर्येकर, अमेय गोसावी, यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संशयिताविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.