बिहार निवडणुकीनंतर राज्यात मोठी उलथापालथ
भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचे भाकीत
बेंगळूर : बिहार निवडणुकीनंतर राज्यात बरेच बदल होणार असून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केले आहे. जात सर्वेक्षणातील गोंधळाबाबत रविवारी म्हैसूरमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सर्वेक्षणातील गोंधळाची व्याप्ती किती आहे हे डी. के. शिवकुमार यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून येते. लोकांना 60 प्रश्न विचारण्यात आले आहेत. या सर्वेक्षणामुळे आणखी गोंधळ निर्माण झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने पूर्वतयारीशिवाय घाईघाईने सर्वेक्षणाचा निर्णय घेतला आहे. विशेष गरजू लोकांना समाविष्ट केल्याबद्दल टीका होत आहे. नोव्हेंबरमध्ये राजकीय क्रांती होईल, अशी चर्चा सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे. नोव्हेंबर क्रांती ही जात जनगणना क्रांतीशी संबंधित आहे, अशी चर्चा आहे.
समाजातील सर्वात दुर्लक्षित व्यक्तीलाही सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. देशांमध्ये जातीय जनगणना करणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे, असे विजयेंद्र यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात असा गोंधळ निर्माण करण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या घाईत आहेत. त्यांनी म्हैसूरमध्ये शक्तिप्रदर्शन केले होते. सिद्धरामय्या रॅम्प वॉक करत होते. त्यावेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि डीके शिवकुमार उपस्थित नव्हते. नोव्हेंबर राजकीय क्रांती होईल, असे काँग्रेस आमदारच म्हणत आहेत. नेतृत्व बदलाबद्दल बोलू नका, हायकमांड त्यावर निर्णय घेईल, असे वेणुगोपाल म्हणतात. पण नेतृत्व बदल अजिबात नाही, असे हायकमांड कोठेही म्हटलेले नाही. त्यामुळे बिहार निवडणुकीनंतर राज्यात बरेच बदल होतील. राज्याच्या राजकारणात खूप गोंधळ उडेल, असा स्फोटक अंदाजही विजयेंद्र यांनी वर्तवला आहे.