For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीएसएफमध्ये मोठी उलथापालथ

06:58 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बीएसएफमध्ये मोठी उलथापालथ
Advertisement

केंद्र सरकारने बीएसएफ महासंचालकांसह दोघांना हटवले : घुसखोरीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आल्याचा फटका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक नितीन अग्रवाल आणि उप विशेष महासंचालक योगेश बहादूर खुरानिया यांना पदावरून हटवले आहे. दोघांनाही आपापल्या होम पॅडरमध्ये (नितीन अग्रवाल यांना केरळ आणि खुरानिया यांना ओडिशा) येथे रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. सध्या एसएसबीचे महासंचालक दलजित सिंग चौधरी यांना बीएसएफ महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. नवीन नियुक्ती होईपर्यंत चौधरी हे काम पाहतील.

Advertisement

केंद्रीय गृह मंत्रालयाने बीएसएफच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करत त्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. बीएसएफचे महासंचालक (डीजी) नितीन अग्रवाल आणि विशेष महासंचालक (स्पेशल डीजी) वाय. बी. खुरानिया यांना त्यांच्या पदावरून हटवून त्यांच्या मूळ केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या एक वर्षापासून दहशतवाद्यांची सातत्याने होत असलेली घुसखोरी हे डीजी आणि स्पेशल डीजी यांना हटवण्याचे प्रमुख कारण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याची भारत सरकारची ही सर्वात मोठी प्रशासकीय कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या महिनाभरात या दोन्ही अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेला भेट देऊन महत्त्वाच्या बैठकांमध्ये भाग घेतला होता. तरीही आता बीएसएफ प्रमुख नितीन अग्रवाल यांना त्यांच्या पदावरून हटवून केरळ केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. अग्रवाल यांनी बीएसएफचे डीजी म्हणून आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेत सीमा सुरक्षा दलाची कार्यक्षमता मजबूत केली. मात्र, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार त्यांना आता त्यांच्या मूळ केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे.

विशेष डीजी वाय. बी. खुरानिया यांनाही गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार त्यांच्या ओडिशातील मूळ केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. खुरानिया यांनी बीएसएफमध्ये विविध वरिष्ठ पदांवर काम करत सीमा सुरक्षेच्या विविध पैलूंवर योगदान दिले आहे. मात्र आता त्यांनाही त्यांच्या मूळ केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे.

रणनीतीत मोठे फेरबदल अपेक्षित

बीएसएफमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर आता नवनियुक्त अधिकारी पदभार कसा घेतात आणि दलाची कार्यक्षमता कशी वाढवतात हे पाहावे लागेल. या बदलानंतर बीएसएफच्या ऑपरेशन्स आणि रणनीतीमध्ये बदल होण्याची शक्मयता आहे. कोणत्याही निमलष्करी दलाचे नेतृत्व करणाऱ्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा प्रकारे हटवण्याची गेल्या अनेक वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. या घटनेचा सुरक्षा दलातील संरचना आणि प्रशासकीय निर्णयांवर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो.

कार्यकाळ पूर्ण न करणारे नितीन अग्रवाल पहिले डीजी

आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे नितीन अग्रवाल हे पहिले बीएसएफ महासंचालक आहेत. ते केरळ केडरचे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार त्यांना कार्यकाळ अर्धवट सोडावा लागत आहे. यापूर्वी बीएसएफ महासंचालक हे पद सांभाळणाऱ्या सर्वांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. अग्रवाल यांनी गेल्यावषी जूनमध्ये पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ 2026 मध्ये पूर्ण होणार होता.

खुरानिया होणार ओडिशाचे डीजीपी?

वाय. बी. खुरानिया हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते विशेष डीजी (पश्चिम) म्हणून पाकिस्तान सीमेवर सुरक्षा प्रभारी होते. खुरानिया यांना ओडिशातील पोलीस महासंचालकची (डीजीपी) जबाबदारी मिळू शकते, असा दावा सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी केला आहे. बीएसएफची जबाबदारी मिळण्यापूर्वीच त्यांनी ओडिशा पोलिसात वरिष्ठ पदावर काम केले होते. अतिरिक्त डीजीपी व्यतिरिक्त ते राउरकेला, मयूरभंज आणि गंजम येथे एसपीही राहिले आहेत. खुरानिया हे भुवनेश्वर, बेहरामपूर आणि संबलपूर रेंजचे डीआयजी आणि आयजीही राहिले आहेत.

वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे...

जम्मू काश्मीर आणि पंजाब सेक्टरमधून सतत होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता न येणे हे या सर्वात मोठ्या कारवाईचे प्रमुख कारण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात वाढत्या दहशतवादी घटना पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय काही अहवालांमध्ये बांगलादेश सीमेवरील घुसखोरी हेही या निर्णयाचे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सीमा संरक्षण ही बीएसएफची जबाबदारी

बीएसएफ भारताच्या पश्चिम भागात जम्मू, पंजाब, राजस्थान आणि गुजरातसह सुमारे 2,290 किमी लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करते. यापैकी जम्मू प्रदेश सीमापार घुसखोरीसाठी संवेदनशील आहे. जम्मूमध्ये घनदाट जंगले आणि डोंगराळ भाग आहेत. या भागात दहशतवादी छुप्या पद्धतीने हल्ले करतात. येथे घुसखोरीचा धोका जास्त आहे. आकडेवारीनुसार, यावषी 21 जुलैपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये 24 चकमकी आणि 11 दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये 14 नागरिक आणि 14 सुरक्षा जवानांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement
Tags :

.