सिंगापूरशी मोठा सेमीकंडक्टर करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे फलित, धोरणात्मक भागीदारीचाही निर्णय
वृत्तसंस्था /सिंगापूर
भारत आणि सिंगापूर यांच्यात सेमीकंडक्टर निर्मिती आणि डिजिटल तंत्रज्ञानासंबंधीचा मोठा करार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्याचे हे फलित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भारताला सेमीकंडक्टर निर्मितीचे केंद्र बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आहे. त्याला अनुसरुन हा करार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सिंगापूरमध्ये आगमन झाले. त्यांचे येथे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांच्याशी द्विपक्षीय संबंध, गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. सिंगापूर हा भारताचा व्यापारात सहाव्या क्रमांकाचा मोठा सहकारी देश आहे. तसेच तो भारतात गुंतवणूक करणारा मोठा देश आहे.
सेमीकंडक्टर करार
भारत सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच सिंगापूरचा डिजिटल विकास विभाग यांच्यात सेमीकंडक्टर उत्पादन करार करण्यात आला आहे. भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्पांमध्ये सिंगापूर गुंतवणूक करणार आहे. भारताने येत्या 5 वर्षांमध्ये प्रतिदिन सात ते नऊ कोटी सेमीकंडक्टर्स आणि मायक्रोचिप्स बनविण्याची क्षमता प्राप्त करण्याची योजना सज्ज केली आहे. सिंगापूर या योजनेला साहाय्य करणार आहे. या शिवाय डीपीआय, सायबर सुरक्षा आणि 5 जी, सुपर काँप्युटींग, सेमीकंडक्टर क्लस्टर विकास आदी क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करणार असून भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स विकासात सिंगापूरचे मोठे योगदान राहणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
इतर क्षेत्रांमध्येही सहकार्य
भारतात वैद्यकीय सुविधा आणि सेवांचे जाळे निर्माण करणे, उत्पादन क्षेत्र आणि दूरसंपर्क क्षेत्रात गुंतवणूक आणि सहकार्य, पर्यावरणस्नेही विकास साधणे, आदी मुद्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये व्यापक चर्चा झाली आहे. या विषयांवरही अनेक करार करण्यात आले आहेत. भविष्यकाळात दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य होण्याचीही शक्यता या निमित्ताने तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
सिंगापूरच्या संसदेला भेट
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरच्या संसदेलाही भेट दिली. संसदभवनात सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वाँग यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी सिंगापूरचे सर्व मंत्री उपस्थित होते. वाँग यांनी त्यांची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करुन दिली. तेथील अतिथीपुस्तिकेतही त्यांनी संदेश लिहून आपल्या भेटीची नोंद केली. सिंगापूर संसदेत ते साधारणत: 1 तास होते.
उत्पादन केंद्रे, उद्योगतींना भेट
सिंगापूरमधील एईएम होल्डिंग्ज लिमिटेड या प्रख्यात सेमीकंडक्टर उत्पादन कंपनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासह लॉरेन्स वाँगही होते. त्यांनी सिंगापूरमधील विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही औद्योगिक सहकार्यासंबंधी विचारविमर्श केला. नंतर त्यांना सिंगापूरचे ज्येष्ठ मंत्री ली हेसिंग लूंग यांनी शाही भोजन दिले, अशीही माहिती देण्यात आली.
दौरा यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया
- सिंगापूर दौऱ्यात परस्पर सहकार्याच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय
- भारताला सेमीकंडक्टरचे उत्पादन केंद्र बनविण्यात सिंगापूरचे योगदान
- इलेक्ट्रॉनिक्स व्यतिरिक्त आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य