सीसी, ओसी नसलेल्या घरमालकांना मोठा दिलासा
राज्य सरकारकडून वीज, पाणी कनेक्शन : मंत्रिमंडळ बैठकीत होणार शिक्कमोर्तब
प्रतिनिधी/ बेंगळूर
बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसताना देखील नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केलेल्या घरमालकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सीसी, ओसीशिवाय 1200 चौ. फुटापर्यंत बांधकाम केलेल्या घरांना वीज आणि पाणी कनेक्शन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
वीज, पाणी आणि स्वच्छता कनेक्शनसारख्या अत्यावश्यक सेवा मिळविण्यासाठी सीसी आणि ओसी अनिवार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 30 सप्टेंबर रोजी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. तसेच अत्यावश्यक सुविधांसाठी एक वेळेकरिता सूट देता येईल का, याबाबत पडताळणी करण्याचे निर्देशही दिले होते. या अनुषंगाने बुधवार 8 ऑक्टोबर रोजी पुन्हा बैठक घेण्यात आली.
ग्रेटर बेंगळूर प्राधिकरण आणि राज्यातील इतर भागांमध्ये सीसी, ओसीशिवाय 1200 चौ. फुटापर्यंत बांधलेल्या इमारतींना वीज आणि पाणी कनेक्शन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे 30 बाय 40 जागेवर बांधलेल्या इमारतींना वीज व पाणी कनेक्शन मिळणार आहे. 1200 चौ. फुटांपेक्षा अधिक जागेवरील इमारतींना अध्यादेशाद्वारे परवानगी देण्याबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. यासंबंधीच्या कायदेशीर अडथळ्यांबाबतही चर्चा होणार आहे.
बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज, महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा, नगर प्रशासन मंत्री रहीम खान, ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे, मंत्री एच. के. पाटील, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव नासीर अहमद, राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश, ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणातील अधिकारी उपस्थित होते.