For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाघवडे-मच्छे रस्त्याला वाली कोण ?

11:40 AM Oct 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाघवडे मच्छे रस्त्याला वाली कोण
Advertisement

रस्त्यावर मोठमोठे खड्डे : रस्ता बनला वाहतुकीसाठी धोकादायक : प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांतून तीव्र संताप

Advertisement

वार्ताहर/किणये 

वाघवडे ते मच्छे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गेल्या काही वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. खड्डेमय रस्त्यामुळे सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. रस्त्याची इतकी दयनीय अवस्था होऊनही दुरुस्ती केली जात नाही. मग आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. आता या रस्त्याला वाली कोण ? असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

Advertisement

खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या रस्त्यावरून खरीप हंगामात शिवाराकडे भात पेरणी करण्यासाठी जात असलेली एक बैलगाडी सदर खड्ड्यांमध्ये पडली होती. यावेळी बैलांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने शेतकरी बचावला होता. अनेक अपघात होऊन बरेचजण जखमी झाले आहेत. काही जणांचा बळी सुद्धा गेला आहे. गेल्या तीन वर्षापासून तर रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे.

यंदाच्या मुसळधार पावसात मच्छे-हावळनगर जवळ रस्त्यावरच भलीमोठी चर पडली होती. यामधून गटारीचे थेट पाणी रस्त्यावरून वाहत होते. तसेच हावळनगर मच्छेजवळ मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी या खड्ड्यांमध्ये माती टाकण्यात आली. मात्र सध्या पुन्हा रस्त्याची परिस्थिती जैसे थे अशीच आहे.

वाघवडे-मुंगेत्री पुलावर रस्ता खचला

वाघवडे-मुंगेत्री नदीच्या पुलावर रस्ता खचला आहे. या पुलावर दोन ठिकाणी खड्डे आहेत. मच्छेहून येताना पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा असल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. यामुळे अनेक वाहनधारक  खड्ड्यामध्ये पडून जखमी झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. मच्छे-वाघवडे रस्त्याच्या बाजूला असलेल्या कारखान्यांना रोज कामगार वर्ग येतात. औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या रस्त्याची दुऊस्ती करण्यात येत नाही. तर मग सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्याकडे सरकार लक्ष कसे देणार, असा सवालही उपस्थित होतो. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करावी व रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांतून होत आहे.

मित्रमंडळी, पै-पाहुण्यांनाही रस्त्याची भीती 

मच्छे-वाघवडे रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाघवडे गावाला मित्रमंडळी व पै-पाहुणे येण्यासाठी घाबरत आहेत. कारण या रस्त्यातून मार्ग काढून गावापर्यंत येणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून वाहतूक करणे अवघड बनले आहेत. प्रशासनाने या खड्डेमय रस्त्याची गांभीर्याने दखल घ्यावी व रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

- महादेव आंबोळकर, वाघवडे 

Advertisement
Tags :

.