मिरचीचा ठसका वाढला
सुक्या मिरचीच्या दरात मोठी वाढ, वादळी पावसाचा पिकाला फटका
बेळगाव : मागील पंधरा दिवसात झालेल्या वादळी पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका बसला. त्यामुळे सुक्या मिरचीचा ठसका अधिकच वाढला आहे. ब्याडगी, गुंटूर आणि संकेश्वरी मिरचीचा दर 100 ते 150 रुपयांनी बेळगाव बाजारात वाढला आहे. मिरचीची आवक मंदावल्यामुळे दरामध्ये वाढ होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. बेळगावची मिरची बाजारपेठ मोठी असल्याने आसपासच्या राज्यातील नागरिक तसेच व्यापारी बेळगावला येतात. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कर्नाटकातील ब्याडगी येथून मिरचीची आवक झाल्याने दर कोसळला होता. यावर्षीही मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. परंतु, मध्यंतरी आलेल्या वादळामुळे
ऑक्टोबरअखेरपर्यंत पाऊस होता. त्यामुळे मिरची उत्पादनाला मोठा फटका बसला. याचा परिणाम आता दरावरही दिसून येत आहे. बेळगावच्या होलसेल मिरची मार्केटमध्ये सुक्या लाल मिरच्यांचा पंधरा दिवसांपूर्वीचा दर 180 ते 200 रुपये किलो होता. परंतु, रविवारी याच मिरचीचा दर 300 ते 350 रुपयांपर्यंत पोहोचला. कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच गुजरात येथून येणाऱ्या मिरचीची आवक मंदावल्यामुळे दर वाढत गेला आहे. त्यामुळे वर्षभरासाठी तिखट करणाऱ्या महिलांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तसेच याचा फटका मसाला उद्योगालाही बसत आहे.
दरावर परिणाम
बेळगावमध्ये ब्याडगी, गुंटूर, संकेश्वरी व जवारी जातीच्या मिरच्यांची आवक होते. यावर्षी हैद्राबाद, ब्याडगी, हावेरी येथून येणारी आवक पावसामुळे मंदावली. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. मागील पंधरा दिवसात दरामध्ये 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली आहे.
- पन्हाळी (मिरची विक्रेते)