शेअरबाजारात शुक्रवारी मोठी घसरण
सेन्सेक्स 765 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी स्वाहा
वृत्तसंस्था/ मुंबई
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापुढे भारताशी व्यापार शुल्काबाबत चर्चा होणार नसल्याचे घोषित केल्याने भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 765 अंकांनी तर निफ्टी 232 अंकांनी कोसळला होता.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 765 अंकांनी घसरुन 79857 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 232अंकांनी घसरुन 24363 स्तरावर बंद झाला. सकाळी बीएसई सेन्सेक्स 100 अंकांच्या घसरणीसोबत 80478 अंकांवर तर निफ्टी 24544 अंकांवर खुला झाला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 समभाग हे घसरणीसोबत बंद झालेले पहायला मिळाले.
भारती एअरटेल, टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा आणि महिंद्रा आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग सर्वाधिक घसरणीत होते. विदेशी संस्थात्मक गुंतवणूदारांनी शुक्रवारीसुद्धा विक्रीवर भर दिला होता. ट्रम्प यांच्या शुल्क नीतिचा नकारात्मक परिणाम शुक्रवारी शेअरबाजारावर मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट, एशियन पेंटस्, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, टाटा स्टिल, इन्फोसिस, लार्सन टूब्रो, हिंदुस्थान युनिलिव्हर, सनफार्मा, टीसीएस, इटर्नल, मारुती सुझुकी, पॉवरग्रीड कॉर्प, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एसबीआय यांचे समभागसुद्धा नुकसानीसोबत बंद झाले.
निफ्टी मिडकॅप-100 निर्देशांक 1.64 टक्के घसरला होता. तर स्मॉल कॅपसुद्धा 1.49 टक्के नुकसानीत राहिला. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत राहिले होते. यामध्ये निफ्टी रिअल्टी निर्देशांक सर्वाधिक 2.11 टक्के घसरलेला होता. या पाठोपाठ मेटल 1.76 टक्के, ऑटो 1.40 टक्के आणि फार्मा 1.30 टक्के घसरणीत राहिले आहेत. जागतिक बाजारामध्ये आशियाई बाजारात मिळताजुळता कल होता. अमेरिकेतील 3 निर्देशांकांनी सुरुवातीची तेजी नंतर गमावली. जपानचा निक्केई निर्देशांक मात्र 1.18 टक्के वाढत व्यवहार करत होता. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.13 टक्के, हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 0.59 टक्के घसरणीत होता.