यंदा हरभरा उत्पादनात मोठी घट
दरात घसरण, उत्पादक शेतकऱ्यांना चिंता
बेळगाव : बदलत्या हवामानाचा परिणाम यंदा कडधान्यांवर झाला आहे. जिल्ह्यात हरभरा उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. उत्पादनाबरोबरच हरभरा दरातही घट झाली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 6000 ते 6200 रु. क्विंटल असणारा हरभरा 5550 रुपयांवर आला आहे. त्यामुळे हरभरा उत्पादकांसमोर विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बी हंगामातील कडधान्य पिकाच्या काढणीला प्रारंभ झाला आहे. तूर, भूईमूग, हरभरा, मसूर, ज्वारी आदी पिकांची काढणी केली जात आहे. मात्र दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
हरभरा उत्पादन सरासरी एकरी 7 ते 8 क्विंटल व्हायला हवे होते. मात्र यंदा ते एकरी 4 ते 5 क्विंटलवर आले आहे. परतीच्या पावसाने जमिनीत अधिक प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. त्यानंतर किडीचा प्रादूर्भावही वाढला होता. त्यामुळे सरासरी एकरी उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. हरभरा उत्पादनासाठी ट्रॅक्टर भाडे, शेणखत, कीटकनाशक फवारणी, खत, तण काढणे, मजुरी आणि इतर कामासाठी एकरी 10 ते 12 हजार रुपये खर्च आला आहे. मात्र सद्यस्थितीत सरकारने हरभऱ्याला प्रतिक्विंटल 5650 रुपये आधारभूत किंमत निश्चित केली आहे. मात्र खर्चाची तुलना करता शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
जिल्ह्यात 14 ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू
बेळगाव जिल्ह्यात 14 ठिकाणी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आधारभूत किंमत योजनेंतर्गत कडधान्यांची खरेदी केली जाणार आहे. हवामान आणि इतर कारणांमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.
-एम. डी. चबनूर (साहाय्यक संचालक कृषी खाते)