रशिया-युक्रेनमध्ये लवकरच मोठा करार
कैद्यांच्या देवाण-घेवाणीवर विचार सुरू : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिले संकेत
वृत्तसंस्था/ कीव
युक्रेन आणि रशियामध्ये एक मोठा करार लवकरच होणार आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी स्वत: रविवारी याची घोषणा केली. युक्रेन आणि रशिया युद्धकैद्यांच्या देवाण-घेवाणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी सक्रियपणे काम करत असून सुमारे 1,200 युक्रेनियन कैद्यांची सुटका होऊ शकते. राष्ट्रीय सुरक्षा प्रमुख रुस्तम उमरोव्ह यांनी शनिवारी वाटाघाटींमध्ये प्रगतीची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झेलेन्स्की यांनी नव्या करारासंबंधीची माहिती जारी केली आहे. रशियाने या दाव्यावर त्वरित भाष्य केले नसले तरी क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सदर प्रस्तावांवर विचार सुरू असल्याचे म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धकैद्यांच्या सुटकेबाबत झेलेन्स्की यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. ‘युद्धकैद्यांच्या देवाण-घेवाणीची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल’ असे ट्विट झेलेन्स्की यांनी केल्यानंतर नव्या कराराचे स्पष्ट संकेत मिळाले. नव्या कराराची पूर्तता करण्यासाठी सध्या बैठका, चर्चा आणि फोन संभाषणे सुरू आहेत. हे पाऊल रशियन तुरुंगात महिन्यांपासून बंदिस्त असलेल्या युक्रेनियन सैनिक आणि नागरिकांच्या परतीसाठी महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे. कैद्यांची देवाण-घेवाण मानवतावादी आधारावर शांतता चर्चेसाठी एक सकारात्मक पाऊल असू शकते. मात्र, डोनबास प्रदेशावर पूर्ण नियंत्रणासारख्या रशियाच्या मागण्या अजूनही अडथळा आहेत.
तुर्की, युएई यांची मध्यस्थी
तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी कैदी देवाण-घेवाण करार पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. तुर्कीच्या मध्यस्थीने झालेल्या वाटाघाटींचे उद्दिष्ट 1,200 युक्रेनियन लोकांना सोडण्याचे आहे. रशियाने अनेक युक्रेनियन सैनिकांना सोडण्यास नकार दिल्याने अलिकडच्या काही महिन्यांत थांबलेल्या प्रक्रियेला पुनरुज्जीवित करण्याचा हा करार आहे. युक्रेन-रशिया यांच्यात जून 2022 पासून सुरू असलेल्या युद्धात 50,000 हून अधिक युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत. तसेच हजारो कैदी बनवले गेले आहेत.