Solapur : शरद पवारांना मोठा धक्का ; काका साठे यांचा राष्ट्रवादीला रामराम
बळीरामकाका साठेंचा मोठा निर्णय
उत्तर सोलापूर : मला जिल्हाध्यक्षपदावरुन काढण्याचे खा. शरद पवार यांच्या मनात यत्किंचतही नव्हते. मात्र, खा. मोहिते-पाटील यांनी मागील रोष मनात धरून आ. अभिजित पाटील यांच्या मदतीने खा. शरद पवार यांच्यापुढे हट्ट धरला. त्यामुळे साहेबांना हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, आता पवारांना भेटणे नाही, असे सांगून शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून कार्यकर्त्यांसह बाहेर पडण्याची घोषणा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व सहा दशकांपासून शरद पवार यांचे निष्ठावंत, अशी ओळख महाराष्ट्रभर असलेल्या बळीरामकाका साठे यांनी आज केली.
गेली सहा दशकांच्या शरद निष्ठेला काळजावर दगड ठेवून जड अंतःकरणाने साठे यांनी आज कायमची फारकत देत असल्याचे जाहीर केले. पाच महिन्यांपूर्वी काका साठे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) च्या जिल्हा अध्यक्षपदावरून काढल्यानंतर त्याचवेळी त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले होते. मात्र, शरद पवार यांनी बारामतीला बोलावून जिल्ह्यात दोन अध्यक्ष ठेवूयात, असे सांगून साठे यांचे डोळे पुसले. त्यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपमध्ये येण्यासाठी साठे यांना आग्रह धरला. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, अमोल शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी गळ घातली.
तर रुपाली चाकणकर यांनी काका साठे यांचे नातू जयदीप साठे यांना काकांना अजितदादांच्या राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले. तरी देखील काका साठे यांनी संयम राखत या वयात शरद पवारांना सोडणे योग्य नाही, असे म्हणून निष्ठा जोपासली. परंतु, गेल्या आठवड्यात जिल्हाभर तालुकाध्यक्षपदाच्या निवडी करीत असताना जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, खा. मोहिते-पाटील यांनी काका साठे यांना विश्वासात न घेता त्यांच्या कार्यक्षेत्रातील दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अध्यक्षाची निवड जाहीर केली. यावरून काका साठे हे चांगलेच संतापले आणि त्यांनी रविवारी बडाळा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात काका साठे यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय आज जाहीर केला.
यावेळी आमदार राजू खरे, प्रल्हाद काशीद, शरद माने, शशिकांत मार्तंडे, प्रकाश चोरेकर, रमेश सुतार, सुभाष शिंदे, भुजंग लंबे, धनंजय माने, हनुमंत टोणपे, तात्या सुपाते, राजू गाटे, रतिकांत पाटील, गणेश पाटील, प्रभाकर गायकवाड, दीपक अंधारे, शिवाजी आवटे, संजय लंबे, जयदीप साठे, स्वप्नील कदम, भैरवनाथ हावळे, विनोद माने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीत मी काकांच्या पाठिशी खंबीर आमदार खरे तीन आमदार एकत्र येऊन काका साठे यांचे राजकारण संपवू पहात आहेत. मात्र, सर्व ताकदीनिशी आपण उत्तर सोलापूर तालुक्यात काका साठे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगून आमदार राजू खरे म्हणाले, काका जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. मी काकांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणार असून उत्तर सोलापूर तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी काकांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे. काकांचे राजकारण संपविणाऱ्यांना मी गावागावात जाऊन सडेतोड उत्तर देणार आहे.