For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का

06:58 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का
Advertisement

पश्चिम बंगालमध्ये ममतांची तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची स्वतंत्रपणे लढण्याची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता, नवी दिल्ली

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘इंडिया अलायन्स’ला मोठा झटका बसण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जागावाटपाच्या चर्चेत गुंतलेल्या ‘इंडिया’ आघाडीतील घटकपक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये ‘एकला चलो’ धोरण अंगिकारण्याची तयारी सुरू केल्यामुळे आघाडीच्या पुढील यशस्वी वाटचालीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे.  काँग्रेसने टीएमसीचा प्रस्ताव नाकारल्यामुळे आपल्या पक्षाने एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्ष पंजाबमधील सर्व 13 जागांवर आगामी लोकसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी घोषणा करताना पंजाबच्या जागांवर कोणाशीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement

‘इंडिया’ आघाडीतील जागावाटपाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील सर्व 42 जागांवर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय ममता बॅनर्जींनी जाहीर केला आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने लोकसभा निवडणूक लढवू, आम्ही आता काँग्रेसच्या संपर्कात नाही. काँग्रेसला स्वबळावर लढू द्या. आम्ही स्वबळावर लढू. लोकसभा निकालानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल,’ असे त्यांनी बुधवारी स्पष्ट केले. आम्ही दिलेले सर्व प्रस्ताव फेटाळल्यामुळे आता आम्ही एकटेच निवडणूक लढवू, असे त्या म्हणाल्या. तसेच आम्ही ‘इंडिया’ आघाडीत असतानाही राहुल गांधींच्या सभेची आपल्याला माहिती देण्यात आली नव्हती, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस-तृणमूल बोलणी जागांवरून फिस्कटली

तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बैठकीची माहिती शेअर केली. पक्षाने दोन जागांची ऑफर दिली होती, परंतु काँग्रेसने अनेकवेळा 10-12 जागांची मागणी केल्याने बोलणी फिस्कटल्याचे सांगण्यात आले. अजूनही वेळ गेलेली नाही. आमच्या पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आम्हाला काँग्रेससोबत जागावाटपाची चर्चा करायची आहे. त्याबद्दल विचार करण्याची गरज नाही, असेही सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी 10-12 लोकसभा मतदारसंघांच्या ‘अवास्तव’ मागणीचा हवाला देत पश्चिम बंगालमधील जागावाटपावरील चर्चेला उशीर केल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली.

पंजाबमध्ये ‘आप’ सर्व 13 जागा लढणार

आम आदमी पार्टीने लोकसभेच्या पंजाबमधील 13 जागांसाठी सुमारे 40 उमेदवार निवडले आहेत. आम आदमी पार्टी लोकसभेच्या 13 जागांसाठी उमेदवारांसाठी सर्वेक्षण करत आहे. या सर्व जागा लढविण्याची तयारी आम आदमी पक्षाने दर्शविल्याने येथेही ‘इंडिया’ आघाडीतील अन्य पक्षांना संधी मिळण्याबाबत साशंकता आहे. आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीतील पक्ष असून दिल्ली आणि पंजाब या राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे. या सत्तेच्या जोरावरच आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्यासाठी कंबर कसली आहे. ममता बॅनर्जींची नाराजी समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाने तातडीने पत्रकार परिषद घेऊन ममतांशिवाय ‘इंडिया’ आघाडीची कल्पनाच करता येणार नाही, असे सांगितले. ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीचा महत्त्वाचा भाग आहेत. कधी कधी स्पीड ब्र्रेकर वाटेत येतात. काहीतरी मध्यममार्ग काढला जाईल, असे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच “इंडिया आघाडीमध्ये कोणताही वाद नाही. आम्ही भाजपविरोधात जोरदार लढा देत आहोत. ममता बॅनर्जी यांना भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वांना पत्र पाठवल्याचे त्यांनी नमूद केले.

ममतांच्या घोषणेनंतर भाजपचे टोमणे

दरम्यान, ममतांच्या घोषणेवर भाजप नेते गौरव भाटिया यांनी कठोर शब्दात टोमणा मारला आहे. तर ‘हे लोक पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी एकत्र आले होते. मात्र या अहंकारी युतीमध्ये सर्वांनाच पंतप्रधान व्हायचे आहे’ असे भाजप नेते गिरिराज सिंह म्हणाले. याशिवाय काँग्रेस नेते प्रमोद कृष्णम यांनी त्यांचे लक्ष्य भाजप नसून काँग्रेस असल्याचा दावा केला. इंडिया आघाडीचे नेते मनाने एक नसल्याचा दावा त्यांनी केला. किंबहुना, गेल्या काही दिवसांपासून टीएमसी आणि काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने वाद सुरू होता, त्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसी लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ धोरण अवलंबणार असल्याचे संकेत मिळत होते. आता ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालच्या सर्व 42 जागांवर एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

Advertisement
Tags :

.