For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका

06:45 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका
Advertisement

आमदार अर्जुन मोढवाडिया यांचा काँग्रेसला रामराम

Advertisement

► वृत्तसंस्था/ अहमदाबाद

लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे मातब्बर नेते आणि पोरबंदरचे आमदार अर्जुन मोढवाडिया यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मोढवाडिया हे भाजपमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काँग्रेसने घातलेल्या बहिष्काराला मोढवाडिया यांनी विरोध दर्शविला होता. तेव्हापासूनच ते पक्षातून बाहेर पडणार असल्याचे मानले जात होते. राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाकारून काँग्रेसने जनतेच्या भावना दुखावल्याचे उद्गार मोढवाडिया यांनी सोमवारी काढले आहेत.

Advertisement

अर्जुन मोढवाडिया हे 1997 मध्ये काँग्रेसमध्ये सामील झाले हेते. यानंतर आमदार आणि मग राज्य विधानसभेत ते विरोधी पक्षनेते झाले होते. मागील गुजरात विधानसभा निवडणुकीत ते पोरबंदर मतदारसंघातून विजयी झाले होते. वर्तमान विधानसभेत ते काँग्रेसचे सर्वात प्रभावी आमदार होते.

मोढवाडिया हे 2004-07 दरम्यान राज्यात नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेसचे प्रमुख चेहरे होते. मोढवाडिया आता भाजपमध्ये सामील झाल्यास गुजरातमध्ये काँग्रेस नेतृत्वहीन होणार आहे.

मी कुणाच्याही भीतीपोटी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. काँग्रेसमध्ये मागील 5-7 वर्षांपासून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काहीच सुधारणा दिसून येत नाही. विद्यार्थीदशेपासून मी काँग्रेसशी जोडला गेला होतो. परंतु आता काँग्रेस पक्ष एक एनजीओ ठरला असल्याचा दावा मोढवाडिया यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे लाडके पुत्र असून राज्याला त्यांचा अभिमान आहे. पंतप्रधानांचा प्रत्येकाने सन्मान करणे आवश्यक असल्याचे म्हणत मोढवाडिया यांनी एकप्रकारे भाजपप्रवेशाचे संकेत दिले आहेत.

काँग्रेसकडे केवळ 14 आमदार

अर्जुन मोढवाडिया यांच्या राजीनाम्यानंतर गुजरात विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी होत 14 वर आली आहे. मोढवाडिया यांच्यापूर्वी खंभातचे आमदार चिराग पटेल आणि मग वीजापूरचे आमदार सी.जे. चावडा यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. आगामी काळात आणखी काही आमदार काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 7 मार्च रोजी गुजरातमध्ये पोहोचणार आहे. अशा स्थितीत राज्यातील नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत.

Advertisement
Tags :

.