बायडेन यांचे आदेश ट्रंप यांच्याकडून रद्द
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात दिलेले 90 टक्क्यांहून अधिक आदेश रद्द करण्याचा निर्णय विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी घेतला आहे. बायडेन यांनी स्वाक्षरी केलेले हे सर्व संबंधित आदेश बेकायदेशीर आहेत. कारण त्यांच्यावरच्या बायडेन यांच्या स्वाक्षऱ्या नैसर्गिक नसून ‘यांत्रिक’ आहेत, असा आरोप डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे. माजी अध्यक्ष बायडेन यांनी या आदेशांवर, क्षमापत्रांवर, प्रशासकीय आदेशांवर आणि अन्य प्रशासकीय कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करताना ‘ऑटोपेन’चा उपयोग केला आहे. अशा प्रकारे यांत्रिक स्वाक्षऱ्या अवैध आहेत. त्यामुळे हे आदेशही अवैध ठरतात. त्यामुळे ते रद्द करण्यात आले आहेत, असे डोनाल्ड ट्रंप यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे.
माजी अध्यक्ष बायडेन यांनी दिलेले आदेश रद्द करण्याचा अधिकार विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना आहे. बायडेन यांनी यांत्रिक स्वाक्षऱ्या केल्या नसत्या, तरी तो अधिकार ट्रंप यांना मिळालाच असता, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे प्रख्यात कायदेतज्ञ एड व्हेलन यांनी व्यक्त केली आहे. तसेच, अमेरिकेच्या अध्यक्षांवर प्रत्येक आदेशावर स्वत:च्या हाताने स्वाक्षरी करण्याचे बंधन नाही. ते आपल्या अधिकाऱ्याला ऑटोपेनचा उपयोग करुन स्वत:ची स्वाक्षरी करण्याचा आदेश देऊ शकतात, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने 2005 मध्येच स्पष्ट केले होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे ऑटोपेनने स्वाक्षरी करुन आदेश लागू करणारे अमेरिकेचे प्रथम अध्यक्ष ठरले होते, अशीही माहिती देण्यात आली आहे.