अमेरिकेत बिडेन-ट्रम्प पुन्हा आमने-सामने
स्वत:च्या पक्षांचे अध्यक्षीय उमेदवार : हिंसेच्या आरोपींची मुक्तता करण्याचे ट्रम्प यांचे आश्वासन
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बिडेन आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहेत. दोघांचीही स्वत:च्या पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार म्हणून निवड झाली आहे. बिडेन आणि ट्रम्प यांनी स्वत:च्या पक्षाच्या डेलिगेट्सचे समर्थन मिळाले आहे. रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षीय उमेदवार होण्यासाठी ट्रम्प यांना 1215 डेलिगेट्सचे समर्थन आवश्यकत् होते, प्रत्यक्षात त्यांना 1228 डेलिगेट्सचे समर्थन प्राप्त झाले आहे. तर बिडेन यांना डेमोव्रेटिक पार्टीचे उमेदवार ठरण्यासाठी एकूण 1969 मते हवी होती, प्रत्यक्षात त्यांना 2107 मते मिळाली आहेत.
मतदारांकडे आता या देशाच्या भविष्याविषयी निर्णय घेण्याचा पर्याय आहे. आम्ही लोकशाहीचे रक्षण करू. इतरांना हा देश तोडू देणार नाही. आम्ही आमच्या स्वातंत्र्याला निवडण्याचा आणि त्याचे रक्षण करण्याचा अधिकार बहाल करू. कट्टरवादी हा अधिकार हिरावून घेऊ शकत नसल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.
2024 मध्ये अध्यक्ष म्हणून पुन्हा विजयी झाल्यास संसदेवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी असलेल्या स्वत:च्या सर्व समर्थकांची मुक्तता करणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. यापूर्वी 2020 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बिडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले होते. यानंतर ट्रम्प यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी संसदेवर हल्ला चढविला होता, याप्रकरणी 1358 ट्रम्प समर्थकांना अटक करत तुरुंगात डांबण्यात आले होते.
ट्रम्प यांना पक्षात मोठे समर्थन
अध्यक्षीय उमेदवार होण्यासाठी रिपब्लिकन पार्टीमध्ये निक्की हेली यांनी ट्रम्प यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मागील आठवड्यात 15 प्रांतांमध्ये प्रायमरी निवडणूक पार पडली होती. यात डेमोक्रेटिक पार्टीमध्ये सर्व 15 प्रांतांमध्ये बिडेन यांची सरशी झाली होती. तर रिपब्लिकन पार्टीमध्sय 14 प्रांतांमध्ये ट्रम्प यांना आघाडी मिळाली होती. ट्रम्प यांनी अध्यक्षीय उमेदवारीच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या निक्की हेली यांना पराभूत केले आहे. यापूर्वी रिपब्लिकन पार्टीमध्ये विवेक रामास्वामी यांनी अध्यक्षीय उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते.