अध्यक्षपदासाठी बिडेन अधिक योग्य
वृत्तसंस्था /मॉस्को
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याऐवजी जो बिडेन हे अधिक चांगले उमेदवार असल्याचे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. बिडेन हे अधिक अनुभवी असून त्यांच्याविषयी अनुमान लावणे अधिक सोपे आहे. बिडेन हे पारंपरिक राजकारण करणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. परंतु आम्ही कुठल्याही अमेरिकन अध्यक्षासोबत काम करण्यास तयार आहोत, असे पुतीन यांनी नमूद केले आहे. पुतीन यांनी पहिल्यांदाच जाहीर स्वरुपात अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसंबंधी वक्तव्य केले आहे. यापूर्वी बिडेन यांच्या मानसिक आरोग्याविषयी पुतीन यांना प्रश्न विचारण्यात आला होता. बिडेन यांना तीन वर्षांपूर्वी स्वीत्झर्लंडमध्ये भेटलो होतो. तेव्हाही बिडेन ही जबाबदारी सांभाळु शकणार नाहीत असे लोक म्हणत होते, परंतु त्यांना भेटल्यावर मला असे काहीच वाटले नाही असे उत्तर पुतीन यांनी दिले आहे.
जून महिन्यात हेलिकॉप्टरमध्ये चढताना बिडेन यांचे डोकं धडकलं होतं. यावर पुतीन यांनी थट्टेच्या सुरात आमचे डोकं देखील कधी ना कधी धडकले असल्याचे सांगितले. डोनाल्ड ट्रम्प हे सिस्टीमला बाजूला ठेवून वागणारे नेते आहेत. त्यांचा बहुतांश प्रकरणांमध्ये एक वेगळाच दृष्टीकोन असतो. अमेरिकेने स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत कशाप्रकारचे संबंध राखावेत, यावरूनही त्यांची विचारसरणी वेगळी असल्याचे पुतीन यांनी नमूद केले. अमेरिकेत यंदा होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी पुन्हा एकदा बिडेन आणि ट्रम्प यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी पुतीन यांच्यासंबधी मवाळ भूमिका घेतली आहे. नाटोचे अनेक सदस्य देश स्वत:च्या संरक्षणाकरता अधिक पैसे खर्च करत नाहीत. हाच प्रकार सुरू राहिल्यास मी रशियाला या देशांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणार असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी एका मुलाखतीत पेले होते. ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पुतीन यांच्यावर टीका करणे टाळले होते.
रशियात मार्चमध्ये राष्ट्रपती निवडणूक
रशियात राष्ट्रपती पदाची निवडणूक मार्च महिन्यात होणार आहे. 1999 पासून पुतीन हे रशियाच्या सत्तेवर आहेत. यावेळी देखील त्यांचा राष्ट्रपती होण्याचा मार्ग मोकळा आहे. रशियाच्या निवडणुकीत पुतीन यांच्या विरोधात उभे असलेल्या दोन्ही उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.