स्मार्ट सिटी योजनेतील सायकली धूळखात पडून
उत्पन्नाऐवजी महापालिकेवर खर्चाचा बोजाच अधिक
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेतून बायसिकल शेअरिंग योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, शहरातील सायकल ट्रॅकची झालेली दूरवस्था, तसेच सायकल वापराकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले असल्याने कोट्यावधी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेल्या सायकली पदपथावर तशाच पडून आहेत. त्यांच्या माध्यमातून उत्पन्न तर नाहीच. मात्र त्यांच्या देखभालीसाठी खर्च करण्याची वेळ स्मार्ट सिटी आणि महापालिकेवर आली आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर गटारी, पथदीप बसविण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीची कामे पूर्ण झाली असल्याने देखभालीची रक्कम महापालिकेकडे वर्ग करून स्मार्ट सिटीचे कार्यालय तूर्तास बंद करण्यात आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजनेतून राबविण्यात आलेल्या विकासकामांची देखभाल आता महापालिकेकडून केली जात आहे. बायसिकल शेअरिंगसाठी शहरात विविध ठिकाणी सायकल डक तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी बॅटरीवर चालणाऱ्या सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सायकलींच्या देखभालीसाठी खर्च
एलअॅण्डटीकडून सायकल ट्रॅकची जिकडेतिकडे खोदाई करण्यात आली आहे. 24 तास पाणी योजनेसाठी सायकल ट्रॅक खोदण्यात आले असल्याने नागरिकांनी सायकलचा वापर करण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायकली तशाच पडून आहेत. बरेच दिवस वापर नसल्याने सायकली नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. या माध्यमातून महापालिका व स्मार्ट सिटीला कोणतेही उत्पन्न मिळत नसले तरी सायकलींच्या देखभालीसाठी खर्च करावा लागत आहे.